सांगलीकर भरतात दूषित पाण्यासाठी कर; नागरिकांच्या आरोग्याबाबत विविध समस्या निर्माण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 12:01 AM2020-01-30T00:01:59+5:302020-01-30T00:02:44+5:30

शेरीनाल्यासह जिल्ह्यातील शंभराहून अधिक गावांचे सांडपाणी मिसळत असल्याने कृष्णा नदी प्रदूषित होत आहे. त्यात पुन्हा योग्य प्रक्रिया करून शुद्ध पाणीपुरवठ्याची जबाबदारी असतानाही, महापालिका सांगलीकरांना शुद्ध पाणी देत नसल्याची बाब उजेडात आली आहे.

 Sanglikers pay taxes for contaminated water | सांगलीकर भरतात दूषित पाण्यासाठी कर; नागरिकांच्या आरोग्याबाबत विविध समस्या निर्माण

सांगलीकर भरतात दूषित पाण्यासाठी कर; नागरिकांच्या आरोग्याबाबत विविध समस्या निर्माण

Next
ठळक मुद्देकारवाईची गरज : महापालिकेच्या दैनंदिन पाणी तपासणीची बोगसगिरी उजेडात

अविनाश कोळी ।

सांगली : शुद्ध पाणीपुरवठ्याचा दावा करून महापालिकेकडून जनतेची शुद्ध फसवणूक सुरू असल्याचे खासगी प्रयोगशाळेच्या अहवालातून उजेडात आले. याच दूषित पाण्यासाठी सांगलीकर कोट्यवधी रुपयांचा कर महापालिकेच्या तिजोरीत भरत आहेत. नागरिकांना आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवणारे दूषित पाणी पिण्यास भाग पाडून महापालिका आता नामानिराळी झाली आहे.

शेरीनाल्यासह जिल्ह्यातील शंभराहून अधिक गावांचे सांडपाणी मिसळत असल्याने कृष्णा नदी प्रदूषित होत आहे. त्यात पुन्हा योग्य प्रक्रिया करून शुद्ध पाणीपुरवठ्याची जबाबदारी असतानाही, महापालिका सांगलीकरांना शुद्ध पाणी देत नसल्याची बाब उजेडात आली आहे.

महापालिकेतील विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांनी सांगलीतील अनेक घरात येणाऱ्या पाण्याचे नमुने खासगी प्रयोगशाळेतून तपासले. यामध्ये अनेक धोकादायक घटक निदर्शनास आले. हे पाणी पिण्यास योग्य नसल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. महापालिका दररोज शुद्धीकरणानंतरच्या पाण्याचे नमुने तपासणीला घेत असते. त्याचा अहवालही पाणीपुरवठा व आरोग्य विभागाकडे असतो.

गेल्या अनेक वर्षांपासून या अहवालात सांगलीचे पाणी पिण्यास योग्य असल्याचे व ते शुद्धतेच्या प्रमाणात बसत असल्याचे दर्शविण्यात आले. जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा हा प्रकार सुरू असतानाच, खासगी प्रयोगशाळेने त्याचे बिंग फोडले.

सांगलीकरांच्या आरोग्याशी महापालिकेने खेळ मांडला आहे. साथीच्या रोगाने येथील लोक हैराण झाले आहेत. महापालिकेवर कुणी आरोप केले, तर त्यानंतर प्रशासनामार्फत पाणी तपासणीचे अहवाल सादर केले जातात. हे अहवाल किती खरे आणि किती खोटे आहेत, याची शहानिशा आजवर कुणी केली नाही. साखळकर यांनी ही शहानिशा केल्यानंतर महापालिकेचा बोगसपणा दिसून आला.

एकीकडे कोट्यवधी रुपयांचा कर सांगलीकरांच्या खिशातून महापालिका काढून घेते. त्याबदल्यात दूषित पाणी व गैरसोयींची भेट नागरिकांना मिळत असल्याचे दिसत आहे. दरमहा पाणीपट्टी भरणाºया नागरिकांना दूषित पाण्यासाठी पैसे मोजावे लागत आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्याही समस्या उद्भवत असून याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.


महापालिकेकडून होते सर्वाधिक प्रदूषण
सांगली शहरातून कृष्णा नदीत प्रतिदिन ५ कोटी ६० लाख लिटर, तर एमआयडीसीमधून प्रतिदिन १ कोटी लिटर सांडपाणी नदीत मिसळत आहे. नदी प्रदूषणात महापालिकेचा मोठा हात आहे. शेरीनाला शुद्धीकरण प्रकल्प अर्धवट स्थितीत ठेवल्याने हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. एकीकडे दुसऱ्या गावांसाठीचा पाणीपुरवठा दूषित करताना महापालिकेने आपल्या क्षेत्रातील नागरिकांनाही दूषित पाणी पाजण्याचे काम सुरू केले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दरवर्षी महापालिकेला दीड कोटीचा दंड केला जातो. वर्षानुवर्षे दंड भरूनही महापालिकेकडून उपाययोजना केल्या जात नाहीत.

 

  • नागरिकांच्या समस्या बेदखल

सांगलीकरांच्या घशात दूषित पाणी जात असतानाही त्याची दखल प्रशासकीय पातळीवर घेतली जात नाही. महापालिकेतील विरोधी पक्षनेत्यांनी पुराव्यासह गंभीर स्थिती मांडल्यानंतरही, बुधवारी प्रशासनाकडून त्याची दखल घेतली गेली नाही. नागरिकांच्या समस्या बेदखल करण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे प्रश्न सुटण्याऐवजी गंभीर रुप धारण करीत आहेत.

  • पाण्यातून होताहेत आजार

खासगी व सरकारी रुग्णालयात दरवर्षी पाण्यामुळे आजारी पडणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. आरोग्य विभागामार्फत कधी याबाबत सर्व्हे केला जात नाही. जल, वायू, ध्वनी प्रदूषणाचा अहवाल महापालिकेने दरवर्षी तयार करणे बंधनकारक असतानाही, तो केला जात नाही. काही ठिकाणी पाईपलाईन फुटल्यानेही दूषित पाणीपुरवठा होत असतो, मात्र अशाठिकाणी नागरिकांनी तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नाही.

Web Title:  Sanglikers pay taxes for contaminated water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.