सांगलीच्या राष्टÑवादीतील वाद वरिष्ठ नेत्यांपर्यंत- संघर्ष टोकाला : दोन्ही गट आरोपांवर ठाम,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 12:50 AM2018-02-08T00:50:04+5:302018-02-08T00:50:57+5:30
सांगली : महापालिका निवडणुकांच्या तोंडावरच सांगली महापालिका क्षेत्रात राष्टÑवादीअंतर्गत वाद विकोपाला गेला आहे. एकमेकांवर कुरघोड्या करीत दोन्ही गट आक्रमक होऊ पाहात आहेत. याबाबतची कल्पना काही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील राष्टÑवादीचे नेते जयंत पाटील यांच्यासह प्रदेश कार्यकारिणीतील वरिष्ठ नेत्यांनाही दिली आहे.
सांगली जिल्हा राष्टÑवादीला गेल्या चार वर्षांपासून वादाचे ग्रहण लागले आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या काळात जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजप व शिवसेनेचा आसरा घेतला. त्यामुळे जिल्ह्यातील राष्टÑवादीचे अस्तित्व धोक्यात आले.
पक्षांतर्गत वाद, नाराजी यावर वेळीच तोडगा काढला गेला नसल्याने या गोष्टी घडत गेल्या. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पक्षाची वाईट स्थिती होत असताना, महापालिका क्षेत्रातील ताकद अबाधित राहिली, मात्र गेल्या दोन वर्षापासून महापालिका क्षेत्रातही पक्षांतर्गत वादाने तोंड वर काढले. पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज आणि विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष कमलाकर पाटील यांच्यात दोन गट पडले आहेत.
बजाज यांच्या कार्यपद्धतीबद्दल कमलाकर पाटील गटाला आक्षेप आहेत, तर कमलाकर पाटील यांचा गट पक्षविरोधी कृती करीत असल्याचे बजाज समर्थकांचे मत आहे. दोन्हीही गट एकमेकांच्या विरोधात उघडपणे संघर्ष करताना दिसत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या पक्षाच्या महाआरोग्य शिबिराला कमलाकर पाटील यांच्या गटातील बहुतांश कार्यकर्ते, नगरसेवक अनुपस्थित राहिले होते.
रुसवाफुगवी कायम...
युवक राष्टÑवादी व अन्य सेलमधील पदांच्या वाटपावरूनही दोन्ही गटात वाद निर्माण झाले होते. पक्षात वर्चस्ववादाची लढाई दोन्ही गटात सुरू आहे. महापालिका निवडणुकीत कोणत्या गटाचे वर्चस्व अधिक राहणार, हा चर्चेचा विषय बनला आहे. निवडणुकीत उमेदवार निवडीसाठी स्थापन करण्यात येणाºया कमिटीतही वर्णी लागावी म्हणून काहींची धडपड सुरू आहे.