स्वच्छतेत सांगलीचे ब्रँडिंग करणार

By admin | Published: January 4, 2017 11:40 PM2017-01-04T23:40:26+5:302017-01-04T23:40:26+5:30

सई ताम्हणकर : सांगली महापालिकेच्या स्वच्छता अभियानात भाग

Sangli's branding in cleanliness | स्वच्छतेत सांगलीचे ब्रँडिंग करणार

स्वच्छतेत सांगलीचे ब्रँडिंग करणार

Next

सांगली : जगातील इतर देशात स्वच्छतेबाबत जितकी जागृती आहे, तितकी जागृती आपल्याकडे नाही. ही जागृती निर्माण करण्यासाठीच सांगली महापालिकेच्या स्वच्छता अभियानात सहभागी झाले आहे. स्वच्छतेत सांगलीचे ब्रॅँडिंग करण्याचा मानस असल्याचे प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर यांनी बुधवारी सांगलीत स्पष्ट केले.
अभिनेत्री सई ताम्हणकर यांची महापालिकेच्या स्वच्छता दूत म्हणून निवड करण्यात आली आहे. बुधवारी त्यांच्या उपस्थितीत स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर पत्रकार बैठकीत त्या म्हणाल्या की, मी सांगलीचीच असल्याने या शहरासाठी काही तरी करण्याची संधी स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून मला मिळाली आहे. गेल्या दोन वर्षात अनेक देशात प्रवास केला. त्या देशात स्वच्छतेबाबत लोक खूपच जागरुक आहेत. आपल्या देशात नागरिक स्वच्छतेबाबत इतके जागरुक नाहीत. सांगलीत स्वच्छतेसाठी नेमकेकाय करायचे, याचे नियोजन सुरू आहे. हागणदारीमुक्त शहरासाठी लोकसहभाग वाढविण्याच्या प्रयत्नात आपला सहभाग असेल.
एखादी जागा अस्वच्छ असेल तर वातावरण चांगले रहात नाही. या स्वच्छतेचा श्रीगणेशा व्हायला कष्ट पडणारच. मला हुल्लडबाजी नको आहे. अभियानातील गांभीर्य हवे आहे. सकाळी काही लोकांशी संवाद साधला. नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे, असेही त्या म्हणाल्या.
आयुक्त रवींद्र खेबूडकर म्हणाले की, वर्षभरापासून स्वच्छता अभियानासाठी सई ताम्हणकर यांनी सांगलीत यावे, यासाठी प्रयत्न सुरू होते. सांगलीचे ब्रॅँडिंग व्हावे, तज्ज्ञ लोकांचा सहभाग वाढवून त्यांच्यात चेतना निर्माण व्हावी, यासाठी हा प्रयत्न आहे. (प्रतिनिधी)

विनामोबदला जागृती
सांगली महापालिकेच्या अभियानासाठी अभिनेत्री म्हणून एकही पैसा घेणार नाही. आपले घर स्वच्छ ठेवायला पैसे कशाला मोजायचे? यात माझा कसलाही स्वार्थ नाही. माझ्या सहभागाने लोकसहभाग वाढत असेल, तर आनंदच आहे. स्वच्छतेसाठी लोकसहभाग वाढवणे, समूह निर्माण करणे हाच स्वच्छ हेतू आहे, असेही सई ताम्हणकर म्हणाल्या.

Web Title: Sangli's branding in cleanliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.