घरातील ऐवजावर डल्ला मारणारी सांगलीची नववधू पुण्यात जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 09:58 PM2018-07-30T21:58:23+5:302018-07-30T22:01:16+5:30
सासूला घरात कोंडून सोन्या-चांदीचे दागिने, रोकड व मोबाईल अशा एकूण चार लाखांच्या ऐवजावर डल्ला मारून पोबारा केलेल्या सोनम नीरव नाकरानी (वय १९) हिला अवघ्या आठ तासांत पकडण्यात संजयनगर पोलिसांना यश आले आहे. पुण्यातून मध्य प्रदेशला
सांगली : सासूला घरात कोंडून सोन्या-चांदीचे दागिने, रोकड व मोबाईल अशा एकूण चार लाखांच्या ऐवजावर डल्ला मारून पोबारा केलेल्या सोनम नीरव नाकरानी (वय १९) हिला अवघ्या आठ तासांत पकडण्यात संजयनगर पोलिसांना यश आले आहे. पुण्यातून मध्य प्रदेशला जाण्यासाठी पाटणा रेल्वेत बसलेल्या सोनमला पकडण्यात आले. तिच्याकडून सोन्याचे १२ तोळ्याचे दागिने, चांदीचे दागिने, वस्तू, मोबाईल व १२ हजारची रोकड असा साडेचार लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
कुपवाड रस्त्यावरील लक्ष्मीनगर ते वसंतदादा कुस्ती केंद्राकडे जाणाऱ्या शंभरफुटी रस्त्यावरील ‘प्रणव क्लासिक’ अपार्टमेंटमध्ये शनिवारी दुपारी ही घटना घडली. नीरव नाकरानी आई, भावासोबत राहतात. त्यांचा कुपवाड एमआयडीसीमध्ये कारखाना आहे. चार महिन्यांपूर्वी त्यांनी नात्यातील सोनमशी प्रेमविवाह केला आहे. ती मूळची मध्य प्रदेशमधील आहे. सोनम रामप्रसाद पटेल हे तिचे माहेरकडील नाव आहे. शनिवारी सकाळी नीरव नाकरानी नेहमीप्रमाणे करखान्यात गेले. घरी त्यांची पत्नी सोनम व आई लीलाबेन कांतिलाल नाकरानी (५८) होत्या. लीलाबेन दुपारी एक वाजता जेवण करून बेडरूममध्ये झोपल्या. याची संधी साधनू सोनम कपाटातील लॉकरमधील सोन्या-चांदीचे दागिने, रोकड व मोबाईल असा ऐवज घेऊन पळून गेली होती. सासू लीलाबेन यांना संशय येऊ नये म्हणून तिने बेडरूमला बाहेरून कडी लावून सासूला कोंडून पोबारा केला होता.
लीलाबेन व त्यांचा मुलगा नीरव यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी सोनमचे मोबाईल लोकेशन काढले. सातारा, वाई, शिरवळ हे लोकेशन दाखवित होते. ती पुण्यातून रेल्वेने मध्य प्रदेशला माहेरी जाईल, असा संशय होता. त्यानुसार पोलिसांनी लोहमार्ग पोलिसांना याची माहिती दिली. सोनमचे छायाचित्रही पाठविले होते. लोहमार्ग पोलिसांनी शनिवारी रात्री मध्य प्रदेशला जाणाºया पाटणा रेल्वेतील प्रवाशांची तपासणी केली. त्यावेळी सोनम सापडली. तिच्याकडे सापडलेल्या बॅगांची झडती घेतल्यानंतर सर्व ऐवज सापडला. ती सापडल्याचे समजताच संजयनगर पोलिसांचे पथक रविवारी सायंकाळी पुण्याला रवाना झाले होते. तिला घेऊन पथक सोमवारी पहाटे सांगलीत दाखल झाले. तिची कसून चौकशी सुरू आहे. पण ती काहीही बोलत नसल्याचे चोरीचे गूढ वाढले आहे. पोलिसांनी तिच्या वडिलांना बोलावून घेतले आहे.
रेकॉर्डपेक्षा जादा ऐवज सापडला
सासू लीलाबेन यांनी तीस ते चाळीस वर्षांपूर्वी खरेदी केलेले हे दागिने आहेत. त्यामुळे नेमका तपशील सांगता आला नव्हता. एकूण ६८ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेल्याचे सांगितले होते; पण प्रत्यक्षात सोनमकडे मोठ्या प्रमाणात दागिने सापडले आहेत. यामध्ये सोन्याची दोन जोड कर्णफुले, चार साखळ्या, मंगळसूत्र, अंगठी, रिंगा, नथ, चांदीच्या जोडव्या सात नग, चांदीची साखळी, गोल शिक्के, ब्रेसलेट, पैंजण सात नग, मोबाईल व १२ हजारांची रोकड असा जवळपास साडेचार लाखांचा ऐवज सापडला आहे. हा ऐवज घरातूनच चोरल्याची कबुली सोनमने दिली आहे.
रिक्षाने रेल्वे स्टेशनला
सासू लीलाबेन यांना कोंडून घातल्यानंतर सोनम ऐवज व काही कपडे बॅगेत भरून अपार्टमेंटमधून बाहेर पडली. ती लक्ष्मीनगर येथे आली. तेथून रिक्षाने ती सांगलीच्या रेल्वे स्थानकावर आली. पावणेपाच वाजता कोल्हापूर-गोंदिया या महाराष्टÑ एक्स्प्रेसने ती पुण्यात गेल्याचा संशय आहे. परंतु ती चौकशीला प्रतिसाद देत नसल्याने हा घटनाक्रम स्पष्ट झालेला नाही. हवालदार जे. ए. बेग तपास करीत आहेत.