सांगलीत ‘बंटी-बबली’चा सराफाला गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 11:01 PM2018-05-20T23:01:09+5:302018-05-20T23:01:09+5:30
सांगली : सोन्याची चेन देऊन त्याबदल्यात नेकलेस खरेदी करायचा आहे असे सांगून, ‘बंटी-बबली’ने सराफ कट्ट्यावरील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक अनिल वामन गडकरी यांना खोटी चेन देऊन हातोहात ५१ हजारांचा गंडा घातला. शनिवारी दुपारी ही घटना घडली. हे ‘बंटी-बबली’ दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
शनिवारी आठवडा बाजार होता. शहर पोलीस ठाण्यापासून कापड पेठ, बालाजी चौक, सराफ कट्टा ते टिळक चौकापर्यंत बाजार भरतो. त्यामुळे प्रचंड गर्दी असते. याच गर्दीचा फायदा घेत दुपारी एक वाजता गडकरी यांच्या दुकानात हे बंटी-बबली घुसले. दुकानातही गर्दी होती. काऊंटरला त्यांनी, चेन मोडून त्याबदल्यात नेकलेस करायचा असल्याचे सांगितले. गर्दीमुळे कामगारांनी चेनची तपासणी केली नाही. दीड तोळ्याची ही चेन होती. तेवढ्याच वजनाचा नेकलेस त्यांनी खरेदी केला. खरेदीची पावती करताना त्यांनी साक्षी शिंदे व विजय शिंदे (रा. बुधगाव, ता. मिरज) अशी नावे सांगितली. नेकलेस घेऊन हे दाम्पत्य दुकानातून निघून गेले. रात्री साडेआठ वाजता गडकरी व कामगार दिवसभरात झालेल्या व्यवसायाची मोजदाद करीत होते. त्यावेळी त्यांनी या ‘बंटी-बबली’ने दिलेल्या चेनची तपासणी केली, तेव्हा ही चेन बनावट असल्याचे समजताच त्यांना धक्काच बसला.
रविवारी सकाळीही गडकरी यांनी चेनची तपासणी केली. मात्र ती बनावट असल्याचेच स्पष्ट झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गडकरी यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी दुकानात भेट देऊन ‘सीसीटीव्ही’ फुटेज ताब्यात घेतले आहे. त्याआधारे तपास सुरु ठेवला आहे.
गडकरी यांनीही राज्यात आणखी कुठे सराफ व्यावसायिकांची फसवणूक होऊ नये, यासाठी या ‘बंटी-बबली’चे फुटेज सराफ असोसिएशनला पाठविले आहे. असोसिएशननेही सर्व सराफ व्यावसायिकांना फुटेजमध्ये कैद झालेल्या ‘बंटी-बबली’चे छायाचित्र व्हॉटस् अॅपवर पाठविले आहे.
कºहाडमध्येही प्रयत्न
गडकरी यांना गंडा घातलेल्या ‘बंटी-बबली’ने कºहाडमध्येही दोन दुकानात बनावट चेन देऊन गंडा घालण्याचा प्रयत्न केला होता. तेथील दुकानातही सीसीटीव्ही फुटेजमध्येही ते कैद झाले आहेत. बंटी ४५, तर बबली ४० वयोगटातील आहे. बंटी शरीराने धिप्पाड आहे. त्याला व्यवस्थित चालताही येत नाही. दोघेही पती-पत्नी असावेत, असा संशय आहे.