सांगलीत घातक शस्त्रसाठा जप्त
By Admin | Published: January 18, 2015 10:58 PM2015-01-18T22:58:19+5:302015-01-19T00:23:25+5:30
संशयितास अटक : चार गावठी कट्टे, तलवारींचा समावेश
सांगली : कुपवाड येथील हमालवाडीत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने छापा टाकून चार गावठी कट्टे, दोन जिवंत काडतुसे, दोन तलवारी असा घातक शस्त्रसाठा जप्त केला. हा शस्त्रसाठा बाळगणाऱ्या सचिन रावसाहेब गावडे (वय २८, रा. हमालवाडी, कुपवाड) या संशयितास अटक करण्यात आली आहे. त्याने ही शस्त्रे बिहारमधून आणल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांच्या पथकाने ही कारवाई केली. सचिन गावडे हा नववी नापास आहे. तो एका बेदाणा व्यापाऱ्याकडे हमालीचे काम करतो. दोन वर्षांपूर्वी कुपवाडमधील दादासाहेब बंडगर व मारुती हाक्के यांच्याशी त्याचा किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादातून बंडगर व हाक्केयांनी त्याला धमकी दिली होती. या धमकीला तो घाबरून होता. हमालीच्या कामासाठी कुपवाडमध्ये बिहारमधील काही तरुण वास्तव्यास आहेत. यामुळे त्यांच्याशी गावडेची ओळख आहे. यातून त्याने त्यांच्याकडून बिहारमधून चार गावठी कट्टे व तलवारी मागवून घेतल्या होत्या. दोन कट्टे तो स्वत: स्वसंरक्षणासाठी बाळगत होता, तर इतर दोन कट्टे तो ग्राहक शोधून विकणार होता, अशी माहिती मिळाली होती. पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहायक निरीक्षक गणेश वाघमोडे, हवालदार कुलदीप कांबळे, बिरोबा नरळे, संदीप गुरव, अरुण टोणे, अशोक डगळे, जितेंद्र जाधव, संदीप मोरे, सचिन सूर्यवंशी, विशाल भिसे, उदय माळी, किशोर काबुगडे, प्रकाश पाटील यांच्या पथकाने गावडेला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याने कमरेला लावलेला एक गावठी कट्टा व दोन काडतुसे मिळून आली. त्यानंतर त्याच्या घरावर छापा टाकून झडती घेण्यात आली. तिथे आणखी तीन गावठी कट्टे व दोन धारदार तलवारी सापडल्या. त्याच्याविरुद्ध कुपवाड पोलिसांत बेकायदा हत्यार बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मीकांत पाटील यांनी आज, रविवारी सायंकाळी गावडेची कसून चौकशी केली. चौकशीत त्याने ही हत्यारे बिहारच्या कामगारांकडून मागविल्याची कबुली दिली आहे. (प्रतिनिधी)
.
सरावासाठी गोळीबार
गावडेकडे एक रिकामी पुंगळी सापडली आहे. त्याने सरावासाठी गोळीबार केला आहे, का आणखी कशासाठी, याची माहिती घेतली जात असल्याचे निरीक्षक घनवट यांनी सांगितले. मिरजेतील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. बी. लवटे यांच्या न्यायालयात त्याला उभे केले होते. न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे