सांगलीचा ड्रेनेजचा प्रश्न संपणार, नदी प्रदूषणही रोखणार; आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली माहिती
By अविनाश कोळी | Published: June 27, 2024 04:27 PM2024-06-27T16:27:10+5:302024-06-27T16:27:34+5:30
३१ डिसेंबरची मुदत, जागेचे अडथळे दूर
सांगली : ड्रेनेजच्या कामासमोर निर्माण झालेले भूसंपादनाचे प्रश्न सोडविण्यात आले आहेत. येत्या ३१ डिसेंबरला सांगलीची ड्रेनेज योजना पूर्णत्वाला जाईल. शेरीनाला शुद्धीकरण योजनेचे अडथळेही दूर केल्याने शासन मंजुरीनंतर योजना कार्यान्वित होईल. सांगलीकरांचा हा दुसरा महत्त्वाचा प्रश्नही लवकरच मार्गी लागलेला दिसेल, अशी माहिती सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी ‘लोकमत’ संवाद सत्रात दिली.
तिन्ही शहरातील नागरी समस्या, त्यांचे निराकरण करण्यासाठी तयार होणाऱ्या योजना, संकल्पना, आरोग्य व शिक्षणासाठी आवश्यक उपक्रम यासह विविध मुद्यांवर आयुक्तांनी संवाद सत्रात मते मांडली. ते म्हणाले की, दोन महिन्यांत सर्व विभागांचा आढावा घेत शहरातील विविध ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली.
ड्रेनेज व पूरग्रस्त भागातील प्रश्न याठिकाणी अधिक गंभीर आहेत. ड्रेनेजचे काम रेंगाळण्यास जागेच्या अडचणी कारणीभूत होत्या. जागामालक व शेतकऱ्यांशी चर्चा करुन भूसंपादनाचा प्रश्न सोडविला आहे. त्यामुळे ड्रेनेजच्या ठेकेदाराला येत्या ३१ डिसेंबरपर्यंत योजना पूर्ण करण्यासाठी मुदत दिली आहे. ठेकेदारानेही यास सहमती दर्शविली आहे. नवे वर्ष ड्रेनेजयुक्त सांगली शहराचे असेल.
याशिवाय नदी प्रदूषण रोखण्यासाठी सांगलीच्या शेरी नाला शुद्धीकरणाची योजनाही शासनदरबारी मंजुरीसाठी प्रस्तावित आहे. या योजनेसमोरही जागेची अडचण होती. तीही दूर झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेसाठी निधी देण्याबाबत सकारात्मकता दर्शविली आहे. महिन्याभरात मंजुरी मिळाली तर मुदतीत ही योजना कार्यान्वित होईल.
नदी प्रदूषणाचा प्रश्न सुटणार
नव्या योजनेमुळे शेरी नाल्याचे सांडपाणी नदीत मिळणार नाही. बाहेरच या सांडपाण्यावर प्रक्रिया करुन शेतकऱ्यांना शुद्ध केलेले पाणी पुरविण्यात येईल. शेतकऱ्यांनी त्याबाबतची मागणी नोंदविली आहे. अनेक वर्षांचा हा प्रश्न लवकरच सुटेल, याची खात्री वाटते.
सिटी सर्व्हे पूर्ण करणार
महापालिका क्षेत्रातील एक मोठा भाग सिटी सर्व्हेपासून वंचित आहे. त्या ठिकाणचा सर्व्हे पूर्ण करुन स्थापत्य विकासाला चालना देण्यात येईल. अजूनही काही जागेचा सातबारा उतारा निघतो. त्यामुळे ही गोष्ट तातडीने मार्गी लावण्यात येईल.
पूरग्रस्त भागासाठी काम
पूरग्रस्त भागातील नागरिक, व्यापाऱ्यांचा त्रास कमी करण्यासाठी काही उपाययोजना करण्याचे नियोजन आहे. पुराचे पाणी वाहून नेणारे स्रोत सक्षम करण्याचा विचार करताना शासन निर्णयानुसार काही पूरबाधित वस्त्यांच्या स्थलांतराबाबतही निर्णय घेतला जाऊ शकतो.
नव्या मंडई विकसित करणार
तिन्ही शहरात रस्त्यावर भरणारे बाजार वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे आहेत. महापालिकेकडे जागांची कमी नाही. त्यामुळे ठिकठिकाणी मंडई विकसित करून विक्रेत्यांची व नागरिकांची व्यवस्था केली जाईल. त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे आयुक्तांनी सांगितले.
आरक्षण विकसित होणार
गुप्ता म्हणाले, महापालिकेचे अनेक खुले भूखंड पडून आहेत. अशा जागांवर अतिक्रमणे होताना दिसतात. लवकरच सर्व भूखंड ताब्यात घेऊन आरक्षणानुसार ते विकसित करण्याच्या दृष्टीने पावले टाकली जातील.
सांगलीत मॉडेल रोड करणार
गुप्ता म्हणाले की, सांगली शहरात एक मॉडेल रोड तयार करण्याचा आमचा विचार सुरू आहे. ज्यामध्ये सुंदर फूटपाथ, झाडांनी आच्छादलेले दुभाजक, बॅरिकेटस्, पाणी निचऱ्याची सोय अशा सर्व सोयींनी युक्त सुंदर आदर्श रस्ता आम्ही बनविणार आहोत.