सांगलीस फळभाज्यांचे क्लस्टर, हजारो कोटींची गुंतवणूक देणार, अमित शाह यांचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2024 01:48 PM2024-05-04T13:48:23+5:302024-05-04T13:51:01+5:30
पवार यांनी दहा वर्षांत काय केले?
विटा/सांगली : सांगलीतील टोमॅटो, बटाटे या फळभाज्यांचे क्लस्टर तयार करणार आहे. तसेच हजारो कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले.
विटा येथे शुक्रवारी सांगली लोकसभेचे महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, गोपीचंद पडळकर, श्वेता महाजन, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, सदाशिव पाटील, राजेंद्र देशमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख, माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष वैभव पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, तानाजी पाटील, ब्रह्मानंद पडळकर, अशोक गायकवाड आदी उपस्थित होते.
शाह म्हणाले, संजय पाटील यांनी सांगलीच्या विकासकामांसाठी खूप संघर्ष केला आहे. त्यामुळे तुमचे मत पंतप्रधान मोदी यांच्या झोळीत जाणार आहे. एकीकडे राहुल याची चायनीज गॅरंटी आहे, तर दुसरीकडे मोदी यांची भारतीय गॅरंटी आहे, तुम्हाला कोणती गॅरंटी हवी, तुम्ही ठरवा. आज नकली शिवसेनेमुळे उद्धव ठाकरे यांच्यामागे कोणीही नाही. त्यामुळे शरद पवारांची आणि काँग्रेसची व्हाेट बँक हीच उद्धव ठाकरेंची नवीन व्होट बँक झाली आहे. कोरोना लसीला राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी लस म्हणून हिणविले आणि गुपचूप बहिणीसोबत जाऊन स्वतः लस टोचून घेतली. असेही शाह म्हणाले.
पवार यांनी दहा वर्षांत काय केले?
महाराष्ट्रातील साखर कारखान्यांची संख्या का कमी झाली? साखर कारखानदारी का अडचणीत आली? याचे शरद पवार यांनी उत्तर द्यावं. तसेच महाराष्ट्रातील ३४ जिल्हा सहकारी बँकांपैकी २ ते ३ बँकांचा अपवाद वगळला, तर उर्वरित सर्व बँकांवर प्रशासक नियुक्त आहेत. महाराष्ट्राची ही अवस्था शरद पवार यांच्याकडे केंद्रीय कृषिमंत्री असतानाच्या दहा वर्षांच्या काळात झाली आहे, अशी टीका शाह यांनी केली.
तुमचा पंतप्रधान कोण?
विरोधकांकडे पंतप्रधान पदासाठी उमेदवार कोण आहे? शरद पवार, ममता बॅनर्जी, एम. के. स्टॅलिन, उद्धव ठाकरे? कोण पंतप्रधान होणार आहे? असा सवाल करीत इंडिया आघाडीतील एकजण जाहीरपणे प्रत्येक वर्षाला एक पंतप्रधान करण्याची भाषा करीत आहे. हे तुम्हाला मान्य आहे का?, असा प्रश्न शाह यांनी उपस्थित केला.
उद्धव ठाकरे यांनी उत्तर द्यावे..
देशात राममंदिर झाले, सीएए कायदा झाला, 'पीएफआय'वर बंदी आली. या सर्व गोष्टी चांगल्या झाल्या की वाईट झाल्या?, याचे उत्तर नकली शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी द्यावे? असा सवाल शाह यांनी केला.