पन्नास वर्षांपासून रखडले सांगलीचे गॅझेटिअर-शासनाच्या दर्शनिका विभागाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 12:37 AM2019-07-21T00:37:57+5:302019-07-21T00:39:18+5:30
सांगली जिल्ह्याच्या साडेआठशे वर्र्षंपूर्वीची संस्कृती, व्यापार व राजांचा कारभार यावर प्रकाशझोत टाकला आहे. त्याबाबतचे पुरावेही गोळा केले आहेत. त्याचा समावेश गॅझेटिअरमध्ये होणे आवश्यक आहे. पुरवणी गॅझेटिअरमध्ये १९७१ ते १९७५ या काळातील साक्षरता, लोकसंख्याविषयक माहिती आहे.
अविनाश कोळी ।
नव्या माहितीचा अभाव
सांगली जिल्ह्याच्या पुरवणी गॅझेटिअरमध्ये पन्नास वर्षांपूर्वीच्या माहितीचा खजाना आहे. त्यात गेल्या पन्नास वर्षांत घडलेल्या, नोंदलेल्या महत्त्वाच्या नोंदी नाहीत. त्याचबरोबर इतिहासात दडलेल्या अनेक गोष्टी गेल्या काही वर्षांत येथील संशोधकांनी शोधून बाहेर काढल्या. साडेआठशे वर्र्षंपूर्वीची येथील संस्कृती, व्यापार व राजांचा कारभार यावर प्रकाशझोत टाकला आहे. त्याबाबतचे पुरावेही गोळा केले आहेत. त्याचा समावेश गॅझेटिअरमध्ये होणे आवश्यक आहे. पुरवणी गॅझेटिअरमध्ये १९७१ ते १९७५ या काळातील साक्षरता, लोकसंख्याविषयक माहिती आहे.
सांगली : जिल्ह्याच्या माहितीचा सर्वांगीण कोश म्हणून ओळख असलेल्या गॅझेटिअरच्या सुधारित आवृत्त्या व प्रकाशित आवृत्त्यांच्या प्रतींची उपलब्धता महाराष्टÑातील अनेक जिल्ह्यात होत असताना, सांगली जिल्ह्याच्या गॅझेटिअरकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. पन्नास वर्षांपूर्वी प्रकाशित करण्यात आलेली प्रत आता उपलब्ध नाही. १९८३ मधील पुरवणीवरच समाधान मानण्यात येत आहे.
प्राकृतिक भूस्वरूप, नद्या, वनसंपदा, स्थळांची भौगोलिक माहिती, लोकांच्या चालीरिती, राजघराण्यांचा इतिहास, अर्थव्यवस्था, महसूल, प्रशासन आणि पुरावशेषांचा तपशील देणारा कोश म्हणून गॅझेटिअरकडे पाहिले जाते. गॅझेटिअर निर्मिती ही एक स्वतंत्र ज्ञानशाखा बनली आहे. महाराष्टÑ राज्य गॅझेटिअर विभागामार्फत (दर्शनिका विभाग) वेळावेळी जिल्हानिहाय व राज्याचे गॅझेटिअर प्रसिद्ध करण्यात येते. या विभागाच्या संकेतस्थळावर आता ई-प्रतही उपलब्ध करण्यात आली आहे, मात्र सांगलीच्या मूळ प्रत या विभागाकडेही उपलब्ध नसल्याने ती अभ्यासकांना मिळत नाही.
नवीन साधनसामग्रीच्याआधारे राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक इतिहासावर नवा प्रकाश टाकणे अपरिहार्य असते. गेल्या पन्नास वर्षांत अनेक संशोधकांनी येथील सामाजिक, सांस्कृतिक इतिहासाचा त्यांच्या अभ्यासातून, परिश्रमातून नव्याने शोध घेतला. गॅझेटिअरमध्ये नसलेल्या अनेक गोष्टी त्यांनी गेल्या काही वर्षात समोर आणल्या. सातत्याने जिल्ह्याच्या माहितीकोशात अशा गोष्टींची भर पडत राहणे तितकेच महत्त्वाचे आहे. यामुळे पुढील पिढीला जिल्ह्याची समग्र माहिती मिळण्यास तसेच त्यांच्या शंकांचे समाधान होण्यास मदत मिळत असते.
जिल्ह्याच्या गॅझेटिअरबाबत गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्ष केले गेले. शेजारील सातारा जिल्ह्याच्या सुधारित आवृत्त्यांचे प्रकाशन झाले. १९९९ मध्ये साताऱ्याचे मराठी भाषेतील गॅझेटिअर प्रकाशित करण्यात आले. त्याचबरोबरच लातूर, वर्धा, नांदेड परभणी, रायगड अशा जिल्ह्यांच्या आवृत्त्या २००० नंतर नव्याने प्रकाशित करण्यात आल्या.
सांस्कृतिक, ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय, क्रीडा, वैद्यकीय, व्यापार, उद्योग, भौगोलिक अशा सर्वच क्षेत्रांबाबत जिल्ह्याला परंपरा आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या उज्ज्वल इतिहासाच्या नोंदी नव्या पिढीसमोर पोहोचविणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी इंग्रजीसह मराठीमध्येही सांगलीचे गॅझेटिअर प्रसिद्ध होणे आवश्यक आहे.