सांगलीच्या द्राक्षांची चीनलाही भुरळ

By Admin | Published: January 1, 2017 10:56 PM2017-01-01T22:56:19+5:302017-01-01T22:56:19+5:30

प्रथमच पंचवीस कंटेनर जाणार : युरोपमध्ये ५२५ कंटेनर निर्यात; शरद सिडलेस वाणाला अधिक पसंती

Sangli's grapefruit even in China | सांगलीच्या द्राक्षांची चीनलाही भुरळ

सांगलीच्या द्राक्षांची चीनलाही भुरळ

googlenewsNext

अशोक डोंबाळे ल्ल सांगली
आखाती देशांसह युुरोपची बाजारपेठ वीस वर्षांपूर्वीच काबीज करणाऱ्या सांगलीच्या द्राक्षांची भुरळ आता चीनलाही पडली आहे. सांगलीतून यंदा प्रथमच थेट चीनमध्ये २५ कंटेनर द्राक्षांची निर्यात होणार आहे.
साधारण १९९१-९२ पासून जिल्ह्यातून द्राक्ष निर्यातीस गती मिळाली. येथील द्राक्षाच्या गोडीने आखाती देशांसह युरोपची बाजारपेठ काबीज केली. आज तब्बल ५५२ कंटेनरमधून ६ हजार ६२५ टन द्राक्षांची निर्यात होऊ लागली आहे. तासगाव तालुक्यातील मणेराजुरी, खानापूर तालुक्यातील पळशी, हिवरे, खानापूर येथील द्राक्षबागा खास निर्यातीसाठी प्रसिद्ध आहेत. ही द्राक्षे चवीला गोड, रंगाने हिरवट, आकाराने उत्तम असल्याने त्यांना विशेष मागणी आहे.
सध्या तासगाव, खानापूरसह आटपाडी, जत, कडेगाव, कवठेमहांकाळ, मिरज, पलूस, वाळवा या तालुक्यांतूनही द्राक्षांची निर्यात होते. त्यामुळे द्राक्षबागायतदारांसह निर्यातदार व्यापाऱ्यांची संख्या वाढली आहे. हे सर्व व्यापारी पूर्वी केवळ दुबईसह आखाती देशांमध्ये द्राक्षांची निर्यात करत. हळूहळू या द्राक्षांची चव युरोपपर्यंत पोहोचली. नेदरलँड, जर्मनी, डेन्मार्क, नॉर्वे, फिनलँड, स्विडन, लिथुआनिया, बेल्जियम, आयर्लंड, स्वित्झर्लंड आणि इंग्लंड येथील बाजारपेठेत सांगलीच्या द्राक्षांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. युरोपच्या बाजारपेठेत हिरव्या द्राक्षांना चांगली मागणी आहे. थॉमसन, सोनाक्का आणि शरद (काळी) या वाणांना जास्त मागणी आहे. तेथील व्यापारी दोन ते तीन महिने आधीच मागणी नोंदवतात.
जिल्ह्यातील निर्यातक्षम द्राक्षांचे ३३०.७५ हेक्टर असणारे क्षेत्र आज ६५५.२९ हेक्टरपर्यंत पोहोचले आहे. द्राक्ष निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दुपटीने वाढून १२४६ पर्यंत पोहोचली आहे. यावर्षी ६६२५ टन द्राक्षांची निर्यात होणार आहे.
भारताच्या शेजारच्या चीनमध्ये मात्र द्राक्षांची थेट निर्यात होत नव्हती. चीनमध्ये द्राक्ष स्वीकारण्यापूर्वी अनेक चाचण्या करवून घ्याव्या लागतात. या चाचण्यांमध्ये द्राक्ष बाद होण्याच्या भीतीपोटीच निर्यात होत नव्हती, परंतु, मागील वर्षी जिल्ह्यातील एका निर्यातदार व्यापाऱ्याने बारा टन द्राक्षांचा एक कंटेनर थेट निर्यात केला होता. त्याला दरही चांगला मिळाला.
आता चीनकडून मागणी वाढली आहे. चीनमध्ये काळ्या द्राक्षांना मागणी असून, शरद सिडलेस या वाणाला जास्त पसंती आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कंटेनर पाठविण्यात येणार असल्याची माहिती कृषी उपसंचालक एम. एल. कुलकर्णी आणि कृषी अधिकारी डी. एस. शिलेदार यांनी दिली. निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांच्या द्राक्षांची कृषी विभागाकडे नोंदणी करून ती निर्यातीसाठी योग्य असल्याचे प्रमाणपत्र दिल्याशिवाय द्राक्षे पाठवू शकत नसल्याचेही कुलकर्णी यांनी सांगितले. दि. १५ डिसेंबरपासून सांगलीतून दुबईसह आखाती देशांमध्ये ५० कंटेनर द्राक्षांची निर्यात झाली आहे. दुबई, युरोप आणि आता चीनमधील नागरिकांना सांगलीच्या द्राक्षांची गोडी लागल्याने भारताच्या तिजोरीत परकीय चलनाची भर पडू लागली आहे.
निर्यातीस : कठोर चाचण्या
द्राक्ष निर्यात करण्यापूर्वी बागेची लहान मुलापेक्षाही अधिक काळजी घ्यावी लागती. या द्राक्षबागेत कीटकनाशके कोणती फवारावीत आणि खते कोणती वापरावीत याविषयी युरोप, आखाती देश व चीनची नियमावली आहे. द्राक्ष निर्यातीपूर्वी त्यामध्ये कोणते घटक आहेत, याची तपासणी करून ते प्रमाणपत्र पेट्यांवर लावणे बंधनकारक आहे. अशी तपासणी करण्यासाठी भारतात मोजक्याच दहा प्रयोगशाळा असून, त्यातील सहा प्रयोगशाळा महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, मुंबई, ठाणे येथे आहेत.

Web Title: Sangli's grapefruit even in China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.