सांगलीत ७० लाखांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2015 01:11 AM2015-12-13T01:11:03+5:302015-12-13T01:11:03+5:30

गोदामावर छापा : व्यापाऱ्यासह चौघे ताब्यात; सुगंधित तंबाखू, सुपारीचाही समावेश

Sangli's gutka seized Rs 70 lakhs | सांगलीत ७० लाखांचा गुटखा जप्त

सांगलीत ७० लाखांचा गुटखा जप्त

googlenewsNext

सांगली : अन्न-औषध प्रशासन व पोलिसांच्या संयुक्त पथकाने सांगलीतील मार्केड यार्डात छापा टाकून सुमारे सत्तर लाख रुपयांचा गुटखा, पान मसाला, सुगंधित सुपारी व तंबाखूचा साठा जप्त केला. शनिवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी गुटख्याची तस्करी करणाऱ्या व्यापाऱ्यासह चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. गुटखा व सुगंधित तंबाखूवर बंदी आल्यापासून सांगलीत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात साठा सापडला आहे.
व्यापारी नरेश शामलाल नानवाणी (वय ४७), त्याचा भाऊ महेश (४२, दोघेही रा. गावभाग, सांगली), रोहित धोंडिराम उदगावे (२४) व इम्रान अक्रम मुजावर (२५, दोघे रा. मिरज) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. उदगावे व मुजावर टेम्पोचालक आहेत. राज्य शासनाने गुटखा, सुगंधित तंबाखू व सुपारीचे उत्पादन आणि विक्रीवर बंदी घातली आहे, तरीही सांगली जिल्ह्यात या मालाची तस्करी करून चौपट दराने विक्री केली जात आहे. मार्केड यार्डातील दुसऱ्या गल्लीत नरेश नानवाणी याची दोन गोदामे आहेत. तेथे मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा केला असल्याची माहिती गुंडाविरोधी पथकाला मिळाली होती.
या पथकाने सायंकाळी पाच वाजता अन्न-औषध प्रशासन विभाग यांची मदत घेऊन संयुक्तपणे छापा टाकला. त्यावेळी उदगावे याच्या टेम्पोमध्ये (एमएच ०९ सीएच ५७७२) व मुजावर याच्या टेम्पोमध्ये (एमएच १० क्यू ३१५३) गुटखा व सुगंधित तंबाखूचा माल भरून जात होता. छाप्याची चाहूल लागताच या दोन्ही चालकांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र तत्पूर्वीच त्यांना ताब्यात घेतले. ही कारवाई सुरू असताना नानवाणी तेथे आला.
पथकाने नानवाणीला गोदामाचे कुलूप काढण्यास सांगितले; पण त्याने नकार दिला. त्यामुळे कुलपाची किल्ली तयार करणाऱ्यास बोलाविण्यात आले. मात्र, चावी लवकर तयार होत नसल्याने पथकाने शेवटी कुलूप तोडून आत प्रवेश केला. दोन्ही गोदामांत मोठ्या प्रमाणात विविध कंपनीचा गुटखा, सुगंधित तंबाखू, सुपारी व पान मसाल्याचा साठा होता. पथकाने माल ताब्यात घेऊन त्याची मोजदाद सुरू केली. एका गोदामात पन्नास, तर दुसऱ्या गोदामात वीस लाख असा एकूण एक सत्तर लाखांचा हा माल आहे. माल मोजण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याने कदाचित हा आकडा आणखी वाढू शकतो, असे अन्न-औषध व प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त डी. एच. कोळी यांनी सांगितले.
ही कारवाई गुंडाविरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार सुनील भिसे, गुंड्या खराडे, महेश आवळे, सागर लवटे, श्रीपती देशपांडे, शंकर पाटील, अरुण पाटील, सुप्रिया खराडे, विशेष पथकातील युवराज पाटील, तसेच अन्न-औषध व प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी रोहन शहा, अनिल पवार, तानाजी कवळे, चंदू साबळे, शिवशंकर सारव्हे यांच्या संयुक्त पथकाने केली.
गुन्हा दाखल
सहायक आयुक्त कोळी म्हणाले की, माल जप्त करण्याची कारवाई पहाटेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर नानवाणी बंधू, चालक उदगावे व मुजावर यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. नानवाणी याने हा माल कोठून आणला, याविषयी त्याच्याकडे चौकशी केली; पण तो काहीही सांगण्यास तयार नाही. मुळात गोदामास कुलूप होते. त्याची किल्ली देण्यास त्याने नकार दिला. शेवटी आम्हाला कुलूप तोडावे लागले. पूर्ण चौकशीनंतर सर्व बाबी उजेडात येतील.
दुसऱ्यांदा सापडला
नानवाणी याचा गोळ्या, बिस्कीट विक्रीचा व्यवसाय आहे. त्याने गोदामात खोल्या तयार केल्या आहेत. बहुतांश खोल्यामध्ये गोळ्या, बिस्किटांऐवजी गुटखा, तंबाखूचा साठा आढळून आला. यापूर्वीही त्याला गुटखा विक्रीप्रकरणी पकडले होते, असे कोळी यांनी सांगितले.

Web Title: Sangli's gutka seized Rs 70 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.