सांगलीतील कोथळे कुटुंबाची उच्च न्यायालयात याचिका; दीपाली काळेंना सहआरोपी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 10:32 PM2017-11-24T22:32:51+5:302017-11-24T22:37:29+5:30
सांगली : सांगली शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत अनिकेत कोथळे याचा पोलिसांनी खून केल्याप्रकरणी मावळत्या पोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांना सहआरोपी करावे,
सांगली : सांगली शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत अनिकेत कोथळे याचा पोलिसांनी खून केल्याप्रकरणी मावळत्या पोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांना सहआरोपी करावे, या मागणीसाठी कोथळे कुटुंबाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
हा तपास स्वतंत्र तपास यंत्रणेमार्फत (एसआयटी) करावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, या घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अमोल भंडारे याचा जबाब सीआयडीने शुक्रवारी न्यायाधीशांसमोर नोंदवून घेतला आहे.
सांगली शहर पोलिसांनी ६ नोव्हेंबरला अनिकेत कोथळे व अमोल भंडारेला अटक केली होती. ‘थर्ड डिग्री’चा वापर करुन अनिकेतला बेदम मारहाण केली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला.
पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे जाळला होता. याप्रकरणी बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला व झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले या सहाजणांना अटक केली होती. सध्या हे सर्वजण न्यायालयीन कोठडीत कोल्हापुरातील कळंबा कारागृहात आहेत. हा तपास सीआयडीकडे आहे. अनिकेतचा खून केल्यानंतर कामटेच्या पथकाने, अनिकेत व अमोल पोलिस ठाण्यातून पळून गेल्याचा बनाव रचला होता. दुसºयादिवशी तत्कालीन पोलिस उपअधीक्षक दीपाली काळे यांनीही अनिकेतच्या नातेवाईकांना, तो पळून गेल्याची माहिती दिली होती. मात्र खरा प्रकार उघडकीस आल्यानंतर नातेवाईकांनी काळे यांच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले.
दीपाली काळे या घटनेस जबाबदार असल्याने त्यांना सहआरोपी करण्याची मागणी नातेवाईक सुरुवातीपासून करीत आहेत. त्यादृष्टीने सीआयडीने काळे यांच्याकडे चौकशी केली. पण पुढे कोणतीच कारवाई झाली नाही. गुरुवारी काळे यांची बदली सोलापूरला करण्यात आली आहे. सीआयडी दखल घेत नसल्याने कोथळे कुटुंबाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी, काळे यांना सहआरोपी करावे, या प्रकरणाचा तपास स्वतंत्र यंत्रणेमार्फत (एसआयटी) करावा, अशी मागणी केली आहे. यावर ४ डिसेंबरला सुनावणी आहे.
सांगलीत आज मोर्चा
दीपाले काळे यांना सहआरोपी करावे, या मागणीवर सर्वपक्षीय कृती समितीही ठम आहे. याच मागणीसाठी समितीच्यावतीने शनिवार दि. २५ रोजी सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. विश्रामबाग चौकातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून सकाळी साडेदहा वाजता मोर्चास प्रारंभ होणार आहे.
भंडारेचा जबाब
लूटमारीच्या गुन्'ात अनिकेत व अमोल भंडारेला सोबतच अटक केली होती. अनिकेतला मारहाण करण्यापासून त्याचा मृत्यू होईपर्यंत, तसेच त्याचा मृतदेह आंबोलीत जाळण्यापर्यंत ज्या घडामोडी घडल्या, त्याचा अमोल भंडारे एकमेव साक्षीदार आहे. सध्या तो लूटमारीच्या गुन्'ात न्यायालयीन कोठडीत सांगलीच्या कारागृहात आहे. सीआयडीने गेल्या आठवड्यात कारागृहात जाऊन त्याची चौकशी करुन जबाब नोंदवून घेतला होता. तो महत्त्वाचा साक्षीदार असल्याने सीआयडीने त्याचा न्यायाधीशांसमोर जबाब नोंदवून घेतला आहे.
डीएनए अहवाल चार दिवसात
अनिकेतच्या मृतदेहाची डीएनए तपासणी पुण्यातील प्रयोगशाळेत केली जात आहे. त्याचा अहवाल चार दिवसात प्राप्त होईल, असे सीआयडीच्या अधिकाºयांनी सांगितले. अनिकेतचा मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत सापडला होता. अनिकेतच्या नातेवाईकांचे रक्त गेल्या आठवड्यात तपासणीसाठी घेतले होते. डीएनए अहवाल तातडीने द्यावा, अशी मागणी सीआयडीने प्रयोगशाळा व्यवस्थापनाकडे केली होती.