सांगलीच्या हळदीला विक्रमी दराची झळाळी-अकरा हजारापर्यंत दर : आवक घटल्याने दरात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 11:52 PM2019-05-08T23:52:08+5:302019-05-08T23:52:55+5:30
संपूर्ण दक्षिण भारतातून वाढलेल्या हळदीच्या आवकेमुळे सांगलीच्या बाजारपेठेतील उलाढाल वाढली असतानाच, बुधवारी झालेल्या हळद सौद्यावेळी हळदीला सरासरी ६ ते ११ हजारपर्यंत दर मिळाला. यंदाच्या हंगामात हळदीचा दर ११ हजाराच्या वर पोहोचल्याने शेतकऱ्यांनी
सांगली : संपूर्ण दक्षिण भारतातून वाढलेल्या हळदीच्या आवकेमुळे सांगलीच्याबाजारपेठेतील उलाढाल वाढली असतानाच, बुधवारी झालेल्या हळद सौद्यावेळी हळदीला सरासरी ६ ते ११ हजारपर्यंत दर मिळाला. यंदाच्या हंगामात हळदीचा दर ११ हजाराच्या वर पोहोचल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. संपूर्ण देशभरातील व्यापाऱ्यांनी येथील सौद्यातून हळद खरेदीस प्राधान्य दिले आहे.
यंदाचा हळद हंगाम सुरू झाल्यापासूनच आवकेत वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत होती. तामिळनाडूतील हळद पिकात घट झाल्याने तेथील व्यापाºयांनीही सांगलीस प्राधान्य दिले होते. तसेच शेजारच्या कर्नाटकात हळदीच्या उत्पादनात वाढ झाली होती. त्यामुळे कर्नाटकसाठी सोयीच्या असलेल्या सांगलीत हळदीची आवक समाधानकारक होती. यंदाच्या हंगामात सरासरी ६ हजार ते ८ हजारापर्यंत दर मिळत होता, तर शेतकºयांना किमान ९ हजाराचा दर अपेक्षित होता. मंगळवारी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पाच दुकानांमध्ये मुहूर्ताचे सौदे झाले. त्यातही सरासरी ९ हजारापर्यंत प्रति क्विंटल दर मिळाला.
सांगलीतील हळदीचा हंगाम चार महिन्यांचा असला तरी, अलीकडे बाराही महिने देशभरातून आवक होत असल्याने, सौदे कमी-जास्त प्रमाणात सुरूच असतात. त्यामुळे हळदीच्या उलाढालीत वाढ होत आहे. वर्षाला सरासरी १२ लाख पोत्यांची आवक आतापर्यंत होत असताना, यंदा मात्र, हीच आवक १८ लाख पोत्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. तसेच वार्षिक उलाढाल ६०० कोटींहून वाढण्याची शक्यता आहे.
मागणी अधिक : पुरवठा कमी
आवक वाढल्याने गेल्या काही सौद्यांमध्ये शेतकºयांकडून मर्यादित हळदीची आवक होत होती. मात्र, बुधवारी झालेल्या सौद्यावेळी १९ हजार ७७७ पोत्यांचा उठाव झाला. मागणीपेक्षा कमी आवक झाल्याने बुधवारी दरात चांगलीच वाढ झाली. यात सेलमसह राजापुरी स्थानिक हळदीचा समावेश होता. ११ हजारापर्यंत दर मिळालेल्या हळदीची प्रतही चांगली होती. त्यामुळे यंदाच्या हंगामातील हा चांगला दर मिळाला.
सांगलीच्या मार्केट यार्डात बुधवारी हळदीचे सौदे पार पडले.