सांगलीच्या एलसीबीची कामगिरी, सालपे येथील वृद्ध महिलेच्या खूनाचा छडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 11:21 AM2018-12-17T11:21:34+5:302018-12-17T11:46:56+5:30
सालपे (जि. सातारा) येथील वृद्ध महिलेचा खून करून सोन्याचे दागिने लुटणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले.
सांगली : सालपे (जि. सातारा) येथील वृद्ध महिलेचा खून करून सोन्याचे दागिने लुटणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले.
या प्रकरणी रोहित चिवळ्या पवार ( रा. वाळवा) याला अटक केली असून आणखी चार जणांची नावेही निष्पन्न झाली आहेत. पुढील तपासासाठी रोहित पवार याला सातारा पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.
पोलिस अधिक्षक सुहेल शर्मा, अतिरिक्त पोलिस अधिक्षक शशिकांत बोराटे यांनी इस्लामपूर, वाळवा या परिसरातील चोरी, घरफोडी, जबरी चोरी अशा गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना दिले होते.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण शिंदे, बिरोबा नरळे, संदीप पाटील, सागर टिंगरे यांचे पथक इस्लामपूर, वाळवा या परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेत होते. पोलिस नाईक बिरोबा नरळे यांना खबऱ्यामार्फत फलटण तालुक्यात चोरीचे गुन्हे करणारा रोहित पवार हा संशयित वाळवा येथे फिरत असल्याची माहिती मिळाली. या पथकाने रोहित पवार याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सालपे येथे खून करून दागिने लुटल्याची कबुली दिली.
सालपे येथे २९ आॅक्टोबर रोजी रात्री दोन ते तीनच्या सुमारास शांताबाई जयवंत खरात (वय ७०) ही महिला प्रातविधीसाठी घराचे बाहेर गेली असता तिच्या पाठीत चाकूने वार करून तिचा खून करण्यात आला होता. तसेच त्यांच्य ागळ्यातील मणी मंगळसुत्र चोरून नेले होते.
या खूनाचा तपास सुरू असून संशयितांची नावे निष्पन्न झाले नव्हती. रोहित पवार याच्या मुसक्या आवळताच हा खूनाचा उलघडा झाला. त्याने मुक्या भीमराव पवार (रा. वाळवा), चंदया जल्या पवार (रा. बडेखान, ता. फलटण), बाप्या परश्या शिंदे (रा. खंडाळा), नकट्या तुक्या शिंदे (रा. लिंबोर) याच्या साथीने शांताबाई खरात यांच्या खून केल्याची कबुली दिली.
स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने लोणंद पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती घेतली. या गुन्ह्याचा पुढील तपासासाठी संशयित पवार याला सातारा गुन्हे अन्वेषण विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
आर्वे येथील घरफोडी उघडकीस
या सर्व संशयितांनी आर्वे (जि. सातारा) येथील एका घरात घरफोडी करून महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र चोरल्याची कबुली दिली आहे. या टोळीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.