अटल सेतूवरील पहिल्या प्रवासाचे मानकरी ठरले सांगलीचे मदन पवार कुटुंबीय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 04:51 PM2024-01-15T16:51:59+5:302024-01-15T16:53:18+5:30
प्रकल्प अधिकाऱ्यांच्या अनपेक्षित स्वागताने भारावला पवार परिवार
इस्लामपूर (सांगली) : मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या देशातील सर्वाधिक लांब अशा २२ किलोमीटर अंतराच्या अटल सागरी सेतूचे देशाला लोकार्पण झाल्यानंतर या पुलावरून पहिले प्रवासी ठरण्याचा बहुमान पेठ नाका (जि. सांगली) येथील निवृत्त कस्टम अधिकारी मदन पवार आणि त्यांच्या परिवाराला मिळाला. यावेळी प्रकल्प अधिकाऱ्यांनी पवार कुटुंबाचे अगत्यपूर्ण स्वागत आणि सत्कार केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी अटल सेतूचे उद्घाटन केले. त्यानंतर शनिवारी १३ जानेवारीच्या रात्री १२ वाजल्यापासून हा पूल जनतेसाठी खुला झाला. याचवेळी मदन पवार हे त्यांची पत्नी आणि ऑस्ट्रेलियावरून आलेल्या मुलीसमवेत मुंबईला निघाले होते. त्यावेळी अधिकाऱ्यांनी पवार यांना गाडी थांबवून खाली उतरण्याची विनंती केली. हा सर्व प्रकार पाहून पवार कुटुंबीय क्षणभर गोंधळले.
पवार यांच्या गाडीसमोर नारळ फोडण्यात आला. तसेच त्यांना भलामोठा बुके, चॉकलेट व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी या पुलावरून मुंबई शहरात जाणारे पहिले प्रवासी अशी ऐतिहासिक नोंद करणारी गव्हाण टोल प्लाझा येथील टोल पावती घेऊन मदन पवार यांनी कुटुंबासह २२ किलोमीटर लांबीच्या अटल सागरी सेतूवरील प्रवासाचा आनंद लुटला.
पवार यांची मुलगी रिचा ऑस्ट्रेलियामध्ये शिकते. तेथे सिडनी-हार्बर हा जगप्रसिद्ध पूल आहे. त्यापेक्षा अधिक चांगला पूल भारतात असल्याचे सांगत मदन पवार यांनी रिचाला या पुलाचे दर्शन घडवून सिद्ध केले. प्रकल्प व्यवस्थापक कैलास गणात्रा, अभियंता अमित पाठक यांनी पवार कुटुंबाचे स्वागत करून त्यांना या पहिल्या ऐतिहासिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.