सांगलीची जागा काँग्रेसकडेच राहणार; नेत्यांकडून आश्वासन - पृथ्वीराज पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 12:33 AM2019-03-19T00:33:14+5:302019-03-19T00:34:52+5:30
सांगली : पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डातील नेत्यांशी चर्चा केली असून, ही जागा काँग्रेसलाच सोडण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली ...
सांगली : पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डातील नेत्यांशी चर्चा केली असून, ही जागा काँग्रेसलाच सोडण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यामुळे ही जागा आम्ही ताकदीने लढविणार आहोत, असे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
ते म्हणाले की, माझ्यासह विशाल पाटील, प्रतीक पाटील यांचीही नावे प्रदेश व केंद्रीय कार्यकारिणीसमोर इच्छुक म्हणून आहेत. त्यामुळे लोकसभेसाठी पक्षाकडून कोण इच्छुक नसल्याची चर्चा चुकीची आहे. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सामील करून घेतले आहे. खा. राजू शेट्टी यांनी हातकणंगलेसह वर्धा जागेची मागणी केली आहे. राष्ट्रवादीने हातकणंगलेची जागा दिली आहे. मात्र वर्ध्याची जागा देण्यासाठी काँग्रेसचे नेते सहमत नाहीत. त्यामुळे सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मागितली आहे. काँग्रेस कार्यकर्ते याच गोष्टीवरून नाराज झाले असून, जिल्हा काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ही जागा देण्यास लेखी विरोध पक्षाकडे केला आहे.
खा. शेट्टी यांच्याशी प्रकाश आवाडे व आ. विश्वजित कदम यांनी चर्चा केली होती. सध्या अकोला अथवा शिर्डी येथील जागा देण्याचा प्रस्ताव पुढे येत आहे. मात्र अद्याप यावर चर्चा झालेली नाही.सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसलाच मिळावी, यासाठी दिल्ली व मुंबईत जाऊन नेत्यांकडे प्रयत्न केले जात आहेत. दोन दिवसात सकारात्मक निर्णय होईल. मी स्वत: इच्छुक आहे. विशाल पाटील लोकसभा लढविण्यास इच्छुक आहेत. त्यांनी प्रदेश व केंद्रीय पातळीवर तशी मागणी केली आहे. पक्षाने मला उमेदवारी दिल्यास मी निवडणूक लढविण्यास तयार आहे. मतदारसंघात प्रचार दौरे केले आहेत. मोदी लाट ओसरली आहे. काँग्रेस पक्षाच्या बाजूने वातावरण आहे. भाजपविरोधात वातावरण आहे. त्यामुळे उमेदवारी मिळाल्यास ही जागा पुन्हा ताब्यात घेऊ, असा विश्वास पृथ्वीराज पाटील यांनी व्यक्त केला.
एकसंधपणाने निवडणुकीचे नियोजन
उमेदवारीसाठी रस्सीखेच होणे हे लोकशाहीचे लक्षण आहे. त्यामुळे आता उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांमध्ये चढाओढ असली तरी पक्षाने एकदा उमेदवार जाहीर केला की काँग्रेसमधील सर्व नेते, कार्यकर्ते एकसंधपणे काम करतील. त्याबाबतचा विश्वासही आम्ही केंद्रीय व राज्यातील नेत्यांसमोर व्यक्त केला आहे. यापूर्वी महापालिकेच्या निवडणुकीतही आम्ही एकत्रितपणे नियोजन केले होते, असे पाटील म्हणाले.