संभाजी पवारांमुळे सांगलीची राजकीय दहशत मोडली
By Admin | Published: May 28, 2017 11:50 PM2017-05-28T23:50:08+5:302017-05-28T23:50:08+5:30
संभाजी पवारांमुळे सांगलीची राजकीय दहशत मोडली
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : आमदार, खासदारांचे दर्शन होत नव्हते, त्या काळात संभाजी पवार आमदार म्हणून निवडून आले. त्यांनी कार्यकर्त्यांना लढण्यासाठी बळ दिले. सर्वसामान्य जनतेचा, कष्टकरी, शेतकऱ्यांचा आमदार, अशी त्यांची ओळख होती. साखर कारखान्याच्या संचालकांविरुद्ध बोलण्यासही बंदी असलेल्या काळात त्यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलने करून सांगलीतील राजकीय दहशत मोडीत काढली, असे प्रतिपादन कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रविवारी केले.
माजी आमदार संभाजी पवार यांचा अमृतमहोत्सवी जीवन गौरव समारंभ रविवारी तरुण भारत क्रीडांगणावर आयोजित करण्यात आला होता. यावेळी खोत बोलत होते. यावेळी माजी मंत्री आ. डॉ. पतंगराव कदम, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आ. शिवाजीराव नाईक, सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, शिवसेनेचे आ. अनिल बाबर, उल्हास पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. मोहनराव कदम, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, महापौर हारुण शिकलगार, उपमहापौर विजय घाडगे, माजी आ. अजितराव घोरपडे, दिनकरतात्या पाटील, हाफिज धत्तुरे, नानासाहेब महाडिक उपस्थित होते.
खोत म्हणाले, संभाजी पवार यांचे बोट धरून मी राजकारणात आलो. वाळवा तालुक्यात प्रवाहाविरोधात काम करताना त्यांचेच पाठबळ होते. जॉर्ज फर्नांडिस, मधु दंडवते, बापूसाहेब काळदाते, ना. ग. गोरे यांच्यासारख्या दिग्गजांना त्यांनी सांगलीत आणले. कार्यकर्त्यांचे मोहोळ तयार केले. मारुती चौकातील त्यांच्या कार्यालयात जनता दरबार भरत असे. पवार आमदार झाले, त्या काळात खासदार, आमदारांचे दर्शन जनतेला होत नव्हते. पण त्यांच्या कार्यालयात कधी पदडा नव्हता, चिठ्ठी देऊन आत जावे लागत नव्हते. कष्टकरी, भाजी विक्रेते, रिक्षाचालक, शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन त्यांनी प्रस्थापितांविरुद्ध लढा दिला. उसाच्या झोनबंदीची बेडी त्यांनी तोडली. तेव्हा आम्ही साखर आयुक्तालय फोडले होते. त्यामागे पवार यांचीच प्रेरणा होती. राज्याला शेरीनाल्याची ओळखही त्यांच्यामुळेच झाली. आजही जनता त्यांच्यामागे उभी आहे.
शिवाजीराव नाईक म्हणाले की, जिल्हा परिषद अध्यक्ष असल्यापासून पवार यांच्याशी ओळख आहे. ते सर्वांचेच गुरू आहेत. १९९५ ला आमदार झाल्यानंतर त्यांच्याशी जवळीक वाढली. विधिमंडळात त्यांनी जिल्ह्याचे प्रश्न मांडताना नेहमीच मदत केली.
महापौर शिकलगार म्हणाले की, माझे वडील अजिज शिकलगार यांना नगराध्यक्ष करण्यात आप्पांचा मोलाचा वाटा होता. आज मी महापौर असताना त्यांचा सत्कार होत आहे, त्यांच्या ऋणातून उतराई होता आले.
अजितराव घोरपडे म्हणाले की, पवार यांचा राजकारणातील प्रवेश विधिलिखित होता. त्यांच्या विजयाने खऱ्याअर्थाने जनतेच्या हाती सत्ता आली. आप्पांचे वलय आजही कायम आहे. त्यांच्या विचाराचा वारसा तरुणांनी पुढे चालवावा.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, पवार यांनी शेतकरी, कष्टकरांचे प्रश्न मांडले. ते सर्वांचे मार्गदर्शक होते. त्यांनी शतकमहोत्सव पार करावे.
सुधीर गाडगीळ म्हणाले की, महाविद्यालयीन जीवनापासून संभाजी पवार यांची ओळख आहे. गेली ४० वर्षे त्यांच्याशी स्नेह आहे. पवार यांच्या पहिल्या निवडणुकीपासून मी त्यांच्यासोबत होतो.
उल्हास पाटील यांनी, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात शेतकरी आंदोलनावेळी संभाजी पवार यांचा मोठा आधार असल्याचे सांगितले, तर सुरेश खाडे यांनीही त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
नगरसेवक गौतम पवार यांनी स्वागत करून वडिलांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकला. गौरव समितीचे अध्यक्ष प्रा. शरद पाटील यांनी प्रास्ताविकात, ऊस झोनबंदी, क्षारपड जमीन, गुंठेवारी विकास, शेरीनाला या प्रश्नांवर त्यांनी आवाज उठविल्याचे सांगितले.
भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, माजी महापौर सुरेश पाटील, गटनेते किशोर जामदार, हमाल पंचायतीचे बापूसाहेब मगदूम, बापूसाहेब पुजारी, बिराज साळुंखे, बापूसाहेब पाटील, नगरसेवक शेखर माने, दिलीप पाटील, बाळासाहेब काकडे, प्रशांत मजलेकर, शेखर इनामदार, सांगली अर्बन बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ उपस्थित होते. पृथ्वीराज पवार यांनी आभार मानले.
राजकारणातील बाहुबली
संभाजी पवार यांचे सहकारी प्रा. शरद पाटील यांनी प्रास्ताविकातच त्यांचा उल्लेख राजकारणातील बाहुबली असा केला. आमदाराची व्याख्याच संभाजी पवार यांनी बदलली. रस्त्यावरचा आमदार अशी ओळख निर्माण केली. त्यांच्यारुपाने अन्यायाविरूद्ध लढणारा नेता जनतेला मिळाला होता. राजारामबापू, व्यंकाप्पा पत्की यांच्यासारख्या ज्येष्ठ मंडळींसह तरुणांनीही त्यांना बळ दिले. त्यांचे वलय आजही कायम आहे, असे सांगताना त्यांनी, अभिनेत्री माधुरी दीक्षीतशी त्यांची तुलना केली. माधुरी आज चित्रपटसृष्टीत नसली तरी, तिचे ग्लॅमर टिकून आहे. तसेच संभाजी पवारांचे वलयही कायम असल्याचे सांगताच उपस्थितांत हशा पिकला.
महापालिकेकडून मानपत्र
संभाजी पवार यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांना महापालिकेच्यावतीने मानपत्र व चांदीची गदा देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. महापौर हारूण शिकलगार, उपमहापौर विजय घाडगे, गटनेते किशोर जामदार यांच्याहस्ते त्यांचा सत्कार झाला. याशिवाय रिक्षा संघटना, स्वातंत्र्यसैनिक संघटना, हमाल पंचायत, पत्रकार संघटना आदींसह विविध संघटना व मान्यवरांनी त्यांचा सत्कार केला.