सांगलीच्या स्किन बँकेमुळे दोन बालकांना जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 02:16 PM2019-05-11T14:16:13+5:302019-05-11T14:19:41+5:30
संपूर्ण राज्यात त्वचादान करण्याच्या बाबतीत सर्वाधिक प्रतिसाद सांगलीत मिळत असतानाच रोटरीच्या स्किन बँकेमुळे दोन बालकांना जीवदान मिळाल्याची घटना सांगलीत घडली. ५२ व ३५ टक्के इतके शरीर भाजले असतानाही या दोन्ही बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून येथील डॉक्टरांनी सांगलीच्या स्किन बँकेचे महत्त्व अधोरेखीत केले.
सांगली : संपूर्ण राज्यात त्वचादान करण्याच्या बाबतीत सर्वाधिक प्रतिसाद सांगलीत मिळत असतानाच रोटरीच्या स्किन बँकेमुळे दोन बालकांना जीवदान मिळाल्याची घटना सांगलीत घडली. ५२ व ३५ टक्के इतके शरीर भाजले असतानाही या दोन्ही बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून येथील डॉक्टरांनी सांगलीच्या स्किन बँकेचे महत्त्व अधोरेखीत केले.
सहा महिन्यांपूर्वी देशातील आठवी आणि महाराष्ट्रातील चौथी त्वचापेढी सांगलीत रोटरीच्या माध्यमातून सुरू झाली. रोटरीच्या पदाधिकारी, सदस्यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत अवघ्या सहा महिन्यात या बँकेस सहाजणांनी त्वचादान केले. मुंबईमध्ये वर्षाकाठी केवळ एकच त्वचादान झाले असताना सांगलीत अवघ्या सहा महिन्यात पाचजणांचा प्रतिसाद मिळाल्याने दिलासा मिळाला.
त्वचापेढी सुरू केल्यानंतर पहिलीच शस्त्रक्रिया नुकतीच पार पडली. याविषयी बँकेचे प्रमुख डॉ. अविनाश पाटील म्हणाले की, विटा येथील दीड वर्षीय अर्णव निलेश सूर्यवंशी हा ५२ टक्के भाजल्याने, तर कर्नाटकातील यलट्टी येथील एक वर्षाचा नीरज बसवराज मगदुम हा ३५ टक्के भाजल्याने रोटरीच्या स्किन बँक व हॉस्पिटलमध्ये दाखल झाला.
एकाचवेळी दोन बालकांना पुरेशा प्रमाणात त्वाचा उपलब्ध असल्याने त्याच्यावर लगेचच उपचारास सुरुवात करण्यात आली. तीन महिन्यांची उपचारपद्धती असताना केवळ एका महिन्यात या दोन्ही बालकांवर उपचार पूर्ण होऊन ते पुन्हा बागडायला लागले. त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावरचे गेलेले हसून पुन्हा फुलले.
कोणताही रुग्ण २५ टक्केपेक्षा अधिक भाजपला तर त्याला वाचविण्यासाठी डॉक्टरांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. सांगलीत दाखल झालेली ही दोन्ही बालके गंभीररित्या जखमी झाल्यामुळे त्यांच्यासमोर जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्वचादान करणाºया व्यक्ति व त्यांच्या कुटुंबियांच्या सत्पात्री दानप्रक्रियेमुळे या दोन बालकांना जीवनदान मिळाले तसेच दोन कुटुंबेही मोठ्या संकटातून बाहेर पडली.
दहन करून मृत व्यक्तीच्या त्वचेची राख तर दफन करून त्वचेची माती होत असल्याने दुसऱ्या जीवाला जीवदान देण्यासाठी व्यक्तीची केवळ ३0 टक्के त्वचा दान करावी, असे आवाहन अविनाश पाटील, रोटरीचे अरुण दांडेकर आदींनी केले.
यांनी केले त्वचादान
सांगलीतील गावभागातील उद्योजक हणमंत गोरे यांचे निधनानंतर, विश्रामबाग जयहिंद कॉलनीतील सावित्री दामोदर शिंदे यांचेही निधनानंतर त्वचादान करण्यात आले होते. या त्वचेचा लाभ जखमी बालकांना झाला. याशिवाय आणखी तीनजणांनी बँकेकडे त्वचादान केल्याचे पाटील म्हणाले.