सांगलीत सर्पदंशाने बालकाचा मृत्यू, झोपेतच दंश : सापास पकडून मारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 12:03 PM2018-09-21T12:03:58+5:302018-09-21T12:08:23+5:30
गाढ झोपेत असताना विषारी सर्पदंश झाल्याने केदार किरण चव्हाण (वय ७ वर्षे, रा. महावितरण निवास्थान, विश्रामबाग, सांगली) या बालकाचा मृत्यू झाला. शुक्रवारी पहाटे तीन वाजता ही घटना घडली. घटनेनंतर लपून बसलेल्या सापाला पकडून ठार मारण्यात आले. याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंद आहे.
सांगली : गाढ झोपेत असताना विषारी सर्पदंश झाल्याने केदार किरण चव्हाण (वय ७ वर्षे, रा. महावितरण निवासस्थान, विश्रामबाग, सांगली) या बालकाचा मृत्यू झाला. शुक्रवारी पहाटे तीन वाजता ही घटना घडली. घटनेनंतर लपून बसलेल्या सापाला पकडून ठार मारण्यात आले. याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंद आहे.
केदारचे वडील किरण चव्हाण हे महावितरणमध्ये वायरमन पदावर नोकरीस आहेत. यवलूज (ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) हे त्यांचे मूळ गाव आहे. दोन वर्षापूर्वी चव्हाण यांची सांगलीला बदली झाली होती. ते महावितरण कार्यालय परिसरातील निवास्थानात ते कुटूंबासह राहत होते.
केदार रात्री दहा वाजता जेवण करुन झोपी गेला होता. पहाटे तो गाढ झोपेत असतानाच अचानक किंचाळत उठला. त्याच्या आई, वडिलांनाही जाग आली. तेवढ्यात मोठा साप तेथून दुसऱ्या खोलीत गेला.
केदारला सापाने दंश केल्याचे लक्षात आले. तो जोरजोराने ओरडू लागला. त्याला तातडीने उपचारार्थ सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. पण उपचार सुरु असताना केदारचा मृत्यू झाला. विच्छेदन तपासणीनंतर केदारचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. विषारी सर्पदंशाने त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
कर्मचाऱ्यांची धाव
केदारला सर्पदंश झाल्याचे समजताच निवासस्थानातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चव्हाण यांच्या घराकडे धाव घेतली. केदारला दंश केलेला सर्प निवास्थानातील घरातच लपून बसला होता. कर्मचाऱ्यांनी त्याला शोधून ठार मारले. केदार पहिलीत शिकत होता. तो एकूलता एक होता. तिच्या मृत्यूने सर्वांनी हळहळ व्यक्त केली.