Everest Trekking : सांगलीच्या सुपुत्राने केले सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:44 PM2021-05-24T16:44:14+5:302021-05-24T16:49:50+5:30
Everest Trekking Sangli : सांगलीचे सुपुत्र व नवी मुंबईत नियुक्तीस असणारे सहाय्यक पोलीस निरिक्षक संभाजी गुरव यांनी एव्हरेस्ट शिखराला गवसणी घालण्यात यश मिळवले. रविवारी सकाळी अंतिम चढाई पूर्ण करत ८ हजार ८४८ मीटर उंचीवर तिरंगा फडकावला.
सांगली : सांगलीचे सुपुत्र व नवी मुंबईत नियुक्तीस असणारे सहाय्यक पोलीस निरिक्षक संभाजी गुरव यांनी एव्हरेस्ट शिखराला गवसणी घालण्यात यश मिळवले. रविवारी सकाळी अंतिम चढाई पूर्ण करत ८ हजार ८४८ मीटर उंचीवर तिरंगा फडकावला.
पहिल्याच प्रयत्नात एव्हरेस्ट पायाखाली घेणारे ते पहिले मराठी पोलीस अधिकारी ठरले आहेत. शिवाय सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील पहिलेच एव्हरेस्टवीर असा पराक्रम त्यांच्या नावे नोंदवला गेला आहे.
पडवळवाडी (ता. वाळवा, जि. सांगली) येथील संभाजी गुरव सुमारे पंधरा वर्षांपासून पोलीस दलात आहेत. एव्हरेस्ट चढाईसाठी दोन वर्षांपासून त्यांची तयारी सुरु होती. गेल्या ६ एप्रिलरोजी मुंबईतून रवाना झाले. नेपाळमधील पायोनियर ॲडव्हेन्चर्स या गिर्यारोहक कंपनीमार्फत सहाजणांच्या पथकातून चढाई सुरु केली. काही दिवसांपूर्वी किलीमांजरी शिखऱ सर केल्याने आत्मविश्वास वाढला होता. १८ मेपासून नेपाळच्या बाजूने प्रत्यक्ष एव्हरेस्टची चढाई सुरु केली.
२१ मे रोजी अंतिम चढाईसाठी चांगले वातावरण असल्याची माहिती हवामान विभागाने दिली होती. बेस कॅम्पला कोरड्या वातावरणात जास्त दिवस राहिल्याने पथक रिकव्हरीसाठी लुकला या ठिकाणी ग्रीनरीमध्ये काही दिवस थांबले. यादरम्यान, त्यांचा शेर्पा आजारी पडल्यानेही अडचण आली. एव्हरेस्ट शिखराच्या खूप जवळ गेल्याची भावना होती, पण कॅम्प क्रमांक तीनपासून पुढे शारिरीक आणि मानसिक कसोटी होती. तेथून पुढे धोकादायक डेथ झोनही होता. बर्फवृष्टी, व्हाईटआऊट (बर्फाचे धुके) याचाही त्रास झाल्याचे गुरव यांनी सांगितले. हिमभेगाही दिसत नव्हत्या, पण अनुभवी शेर्पामुळे चढाई शक्य झाली.
पहिलेच मराठी पोलीस अधिकारी
सांगलीचे तत्कालीन पोलीस अधिक्षक सुहैल शर्मा व अौरंगाबाद येथील पोलीस कर्मचारी रफीक शेख यांनी यापूर्वी एव्हरेस्ट सर केला आहे, पण संभाजी शर्मा पंजाबी अधिकारी तर शेख पोलीस कर्मचारी होते. गुरव हे पहिले मराठी पोलीस अधिकारी ठरले आहेत.
चौकट
गडचिरोलीमध्येही पराक्रम
गुरव यांनी गडचिरोलीमध्ये असताना केलेल्या धा़डसी कामगिरीबद्दल २०१४ मध्ये राष्ट्रपती पदक, २०१५ मध्ये विशेष सेवा पदक, २०१८ मध्ये आंतरिक सेवा पदक व महासंचालकांचे विशेष पदक मिळवले आहे. धाडसी पोलीस अधिकारी अशी त्यांची पोलीस दलातील प्रतिमा आहे.
अशी केली चढाई
- १८ मे - बेस कॅम्प ते कॅम्प २
- १९ मे - कॅम्प २ ते कॅम्प ३
- २० मे - कॅम्प ३ ते कॅम्प ४
- २१ मे - कॅम्प ४ ते एव्हरेस्ट समिट
- २३ मे सकाळी - शिखरावर तिरंगा
पडवळवाडीमध्ये आनंदोत्सव
संभाजी गुरव यांचे मूळ गाव असलेल्या पडवळवाडीमध्ये सकाळीच गुरव यांच्या भीमपराक्रमाची माहिती समजली. त्यानंतर आनंदोत्सव साजरा झाला. वडील नारायण यांनी मुलाच्या कर्तृत्वाचा खुपच आनंद झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. संंभाजी यांच्या पत्नी सुजाता म्हणाल्या, गेली दोन वर्षे एव्हरेस्ट चढाईसाठी प्रयत्न सुरु होते, या मेहनतीचे चीज झाले.