सांगलीच्या सुपुत्राची अमेरिकेतील सर्वोच्च शिखरावर चढाई, प्राणवायूची उपलब्धता ५० टक्केच 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 02:01 PM2023-01-27T14:01:41+5:302023-01-27T14:02:02+5:30

संभाजी गुरव पुण्यात सहायक पोलिस निरीक्षक म्हणून काम करतात. गिर्यारोहणात आजवर अनेक विक्रम केले आहेत

Sangli's son Sambhaji Gurav climbed the highest peak in America | सांगलीच्या सुपुत्राची अमेरिकेतील सर्वोच्च शिखरावर चढाई, प्राणवायूची उपलब्धता ५० टक्केच 

सांगलीच्या सुपुत्राची अमेरिकेतील सर्वोच्च शिखरावर चढाई, प्राणवायूची उपलब्धता ५० टक्केच 

googlenewsNext

सांगली : जगातील सात खंडांतील सातही सर्वोच्च शिखरे वर्षभरात सर करण्याचा निर्धार केलेल्या संभाजी गुरव यांनी विक्रमाच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. रविवारी (दि. २२) दक्षिण अमेरिका खंडातील अँडिज पर्वत रांगेतील सर्वोच्च माउंट अकानकागुआ सर केले. त्यांनी सर केलेले हे पाचवे शिखर आहे.

पडवळवाडी (ता. वाळवा) येथील रहिवासी असणारे संभाजी गुरव पुण्यात सहायक पोलिस निरीक्षक म्हणून काम करतात. गिर्यारोहणात आजवर अनेक विक्रम केले आहेत. दोन दिवसांपूर्वी सेव्हन समिटमधील एव्हरेस्टनंतरचे सर्वोच्च अकानकागुआ शिखर सर केले. मोहिमेत त्यांच्यासोबत स्वित्झर्लंड, अमेरिका, फिनलंड, पनामा, अर्जेंटिना आदी देशांतील गिर्यारोहक होते.

१३ जानेवारीस कॅनफ्लूएन्सिया येथे मुक्काम केला. रात्री दहा वाजले तरी सूर्य तळपत होता. १४ जानेवारीस रंगीत तालमीसाठी ४३०० मीटर उंचीवरील प्लाझा दी फ्रान्सिया येथे चढाई केली. १७ जानेवारीस बेस कॅम्पवरून पाठीवर १५ किलो वजनासह ११०० मीटर उंचावरील कॅंप दोनवर पोहोचले.

२० जानेवारीस तेथूनच थेट चढाई करण्यास सुरूवात केली. २२ जानेवारीस पहाटे गोठविणाऱ्या थंडीत निर्णायक चढाई सुरू झाली. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास शिखर माथ्यावर त्यांनी  पाऊल ठेवले. गुरव म्हणाले की, हा पर्वत या काळात कोरडा असतो; पण आम्हाला बर्फवृष्टीचा सामना करावा लागला. तापमान उणे २० अंश सेल्सिअसपर्यंत घसरले होते. पर्वत दोन महासागरांमध्ये असल्याने जोराचा वारा होता. प्राणवायूची उपलब्धता ५० टक्केच होती.

या मोहिमेसाठी पोलिस महासंचालक संजयकुमार, आयुक्त रितेशकुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर आयुक्त जालिंदर सुपेकर, पुणे शहर उपायुक्त आर. राजा यांनी पाठबळ दिल्याचे गुरव यांनी सांगितले.

असा झाला विक्रमाकडे प्रवास

२३ मे २०२१ रोजी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर केले होते. त्यानंतर सातही खंडांतील सात सर्वोच्च शिखरे एका वर्षात पायाखाली घेण्याचा निर्धार त्यांनी केला होता. त्यानुसार २६ जुलै २०२१ रोजी युरोपातील सर्वोच्च शिखर माउंट एल्ब्रस सर केले.

१५ ऑगस्ट २०२१ रोजी आफ्रिका खंडातील माउंट किलीमांजारोवर तिरंगा फडकविला. २९ सप्टेंबर २०२२ रोजी ऑस्ट्रेलिया खंडातील सर्वोच्च माउंट कोजीअस्कोवर चढाई यशस्वी केली. त्यानंतर अमेरिकेतील २३ हजार फूट उंचीचे माउंट अकानकागुआ सर करून विक्रमाचा पाचवा टप्पा पूर्ण केला.

Web Title: Sangli's son Sambhaji Gurav climbed the highest peak in America

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली