सांगलीत अण्णा भाऊंचा पुतळा बसविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 01:01 AM2017-08-01T01:01:14+5:302017-08-01T01:04:13+5:30
सांगली : येथील कर्मवीर चौकातील जिल्हा बँकेसमोरील बागेत रविवारी मध्यरात्री कार्यकर्त्यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा बसविला. विश्रामबाग पोलिसांना याची माहिती मिळताच सोमवारी सकाळी कर्मवीर चौकात बंदोबस्त तैनात केला. कार्यकर्तेही मोठ्या संख्येने जमल्याने तणावपूर्ण शांतता होती.
अण्णा भाऊ साठे यांचा सांगलीत जिल्ह्याच्या ठिकाणी पुतळा बसविण्यात यावा, अशी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होती; पण याकडे शासन व जिल्हा प्रशासनाने नेहमीच दुर्लक्ष केले आहे. दलित महासंघ, डेमोक्रॅटिक पार्टी, रिपब्लिकन पार्टी, बहुजन समाज पार्टी यांनी अनेकदा जिल्हाधिकारी व महापालिकेकडे पुतळा बसविण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती, पण पालिकेने शहरात कोठेही जागा उपलब्ध करून दिली नाही.
मंगळवारी अण्णा भाऊ साठे यांची जयंती असल्याने शहरातील तसेच जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन रविवारी रात्री कर्मवीर चौकातील जिल्हा बँकेसमोरील बागेत अण्णा भाऊ साठे यांचा अर्धपुतळा बसविला. याठिकाणी झेंडेही लावण्यात आले. मंगळवारी याठिकाणी उत्साहात जयंती करण्याचे नियोजन केले आहे.
सोमवारी सकाळी पोलिसांना पुतळा बसविल्याची माहिती मिळाली. यासाठी कोणतीही परवानगी न घेतल्याने हा वादाचा विषय होऊ शकतो, असा अंदाज बांधून कर्मवीर चौकात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलिस पुतळा काढून टाकतील, अशी भीती निर्माण झाल्याने दलित महासंघ, डेमोक्रॅटिक पार्टी, रिपब्लिकन पार्टी, बहुजन समाज पार्टी, राष्टÑवादी काँग्रेससह विविध संघटनांच्या नेत्यांनी गर्दी केल्याने तणाव निर्माण झाला. पुतळा बसविलेली बागेची जागा महापालिकेची आहे, पण पालिकेने येथून पुतळा हटवू नये, अशी कार्यकर्त्यांनी मागणी केली. कार्यकर्ते व पोलिस चौकात थांबून होते.
रविवारी सांगलीत माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे खासगी कार्यक्रमानिमित्त आले होते. त्यांनीही अण्णा भाऊंचा सांगलीत पुतळा उभा करण्यासाठी महापालिका व जिल्हा परिषदेने पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली होती, तसेच सांगलीतही अनेक संघटनांची हीच मागणी होती. या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याने कार्यकर्त्यांनी एका रात्रीत अण्णा भाऊंचा पुतळा बसविला. जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचेही आयोजन केले.
दहा दिवसांनंतर पर्यायी जागा
निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांच्या उपस्थितीत दुपारी बैठक झाली. या बैठकीत दहा दिवस हा पुतळा कर्मवीर चौकातील बागेतच बसविण्याचे ठरले. या काळात शहरात पर्यायी जागा पाहून पुतळा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचे कार्यकर्त्यांनी कर्मवीर चौकात गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करून स्वागत केले. यावेळी सुरेश दुधगावकर, असिफ बावा, किरणराज कांबळे, प्रियानंद कांबळे, गॅब्रीयल तिवडे, चरण चौगुले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.