सांगलीचा यश पारीक जाणार हवाई सफरीवर
By admin | Published: July 5, 2016 11:42 PM2016-07-05T23:42:44+5:302016-07-06T00:16:22+5:30
भाग्यवान विजेता : ‘लोकमत’ बाल मंचच्या सोडतीत संधी
सांगली : ‘लोकमत’ बाल विकास मंचतर्फे २०१५-१६ या वर्षाकरिता सभासद झालेल्या मुलांना सोडतीद्वारे बक्षिसे जाहीर करण्यात आली. या राज्यस्तरीय सोडतीत राज्यातील ५१ मुलांना हवाई सफरीची संधी मिळाली असून, सांगली जिल्ह्यातून श्रीराम रामदयाळ मालू हायस्कूलच्या यश अनिल पारीक या दहावीतील विद्यार्थ्याचाही यात समावेश आहे. बक्षिसाची माहिती मिळताच मालू हायस्कूलसह त्याच्या कुटुंबियांनी आनंद साजरा केला.
‘लोकमत’च्या मागीलवर्षी झालेल्या सभासद योजनेत अनेक आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती. यामध्ये हवाई सफरीच्या बक्षिसाचे आकर्षण सर्वांनाच होते. मुंबई ते दिल्ली आणि दिल्ली ते मुंबई असा हा हवाई प्रवास असून, दिल्लीतील सर्व मुख्य ठिकाणांना भेट देतानाच त्यांची माहिती करून देण्याचे काम ‘लोकमत’च्यावतीने करण्यात येणार आहे. कमी वयात देशाच्या राजधानीची माहिती जवळून घेण्याची तसेच यानिमित्ताने हवाई सफरीचा आनंद लुटण्याची ही संधी मिळण्याची प्रत्येकालाच प्रतीक्षा होती. सोडतीद्वारे ५१ भाग्यवान मुलांना ही संधी देण्यात आली. त्यामध्ये मालू हायस्कूलच्या यशचे नाव आल्याने शाळेमध्ये आनंद साजरा करण्यात आला. शाळेत त्याचा सत्कारही करण्यात आला.
बाल विकास मंचतर्फे दरवर्षी बक्षीस योजनांसह अनेक मनोरंजनाचे, शैक्षणिक विकासाचे कार्यक्रम, स्पर्धा आयोजित केल्या जातात. जिल्हास्तरावरही सोडतीद्वारे बक्षिसे देण्यात येतात. त्यामुळे शालेय स्तरावरील हजारो विद्यार्थी दरवर्षी योजनेतून सभासद होत आहेत. गतवर्षी सभासद झालेल्या मुलांपैकी यश याला संधी मिळाली आहे.
यशचे वडील बांधकाम व्यावसायिक आहेत. आई गृहिणी असून, तो एकुलता एक मुलगा आहे. विश्रामबाग येथील खरे मंगल कार्यालयाजवळ ते राहतात. ‘लोकमत’च्या बक्षीस योजनेत त्याला हवाई सफरीची संधी मिळाल्याचे कळाल्यानंतर घरात आनंद साजरा करण्यात आला.
सांगलीतील मालू हायस्कूलमध्ये मंगळवारी यशचा सत्कार समारंभ पार पडला. यावेळी ‘लोकमत’चे शाखा व्यवस्थापक विक्रम हसबनीस व मुख्याध्यापिका सुचेता पाठारे यांच्याहस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शिक्षक दिलीप पवार, पर्यवेक्षक बाळकृष्ण पाटणकर, यशची आई योगिता व अन्य नातेवाईक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘संस्कारांचे मोती’मुळे हवाई सफरीसह पंतप्रधानांची भेट
‘लोकमत’च्या ‘संस्कारांचे मोती’ या शालेय सामान्यज्ञान स्पर्धेच्या माध्यमातून २०१३ ते २०१६ या कालावधित जिल्ह्यातील चार विद्यार्थ्यांना मुंबई ते दिल्ली या हवाई सफरीबरोबरच राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षणमंत्री, केंद्रीय गृहमंत्री यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली.