सांगलीचे सुधीर गाडगीळ २९ कोटींचे धनी
By admin | Published: September 29, 2014 12:26 AM2014-09-29T00:26:33+5:302014-09-29T00:28:28+5:30
सांगली विधानसभा : मदन पाटील, पृथ्वीराज पवार, सुरेश पाटीलही कोट्यधीश
सांगली : सांगली विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये भाजपचे धनंजय (सुधीर) गाडगीळ हे सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. ते २९ कोटींचे धनी आहेत. निवडणुकीत तुल्यबळ ठरणारे बहुतांश उमेदवार कोट्यधीशच आहेत.
दिग्गज मंत्री, नेते आणि अन्य उमेदवारांची गर्दी सांगली जिल्ह्यातील विधानसभेच्या मैदानात झाली आहे. आर्थिक सक्षमतेच्या जोरावरही काहींनी शड्डू ठोकला आहे. दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार सांगली विधानसभेतील उमेदवारांची संपत्ती किती आहे, याची माहिती प्रशासनाने वेबसाईटवर टाकली आहे. त्यानुसार सुधीर गाडगीळ, मदन पाटील, सुरेश पाटील, पृथ्वीराज पवार हे कोट्यधीश उमेदवारांच्या यादीत आहेत.
भाजपचे गाडगीळ यांची जंगम मालमत्ता २३ कोटी ७३ लाख रुपये, तर स्थावर मालमत्ता ५ कोटी ३३ लाखांच्या घरात आहे. त्यांच्याकडे १ कोटी १५ लाखांची रोकड आहे. विविध बँकांमध्ये सुमारे पाच कोटीच्या ठेवी आहेत. ३ कोटी ९९ लाखांची शेअर गुंतवणूक असून, पोस्टात ८७ लाखांची ठेव आहे. जवळपास २३ कोटींचे सोने त्यांच्याकडे आहे. त्यांनी ६ कोटींचे कर्जही काढले आहे.
काँग्रेसचे उमेदवार मदन पाटील यांची जंगम मालमत्ता ८१ लाखांची असून, स्थावर मालमत्ता ५ कोटी २ लाखांची आहे. त्यांच्या पत्नीच्या नावावर ४२ लाखांची जंगम, तर २ कोटी ३७ लाखांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्या कुटुंबाकडे ३८० ग्रॅम सोने, तर ४२० ग्रॅम चांदी आहे. विविध कंपन्यांच्या चारचाकी व दुचाकी त्यांच्याकडे आहेत. विविध बँकांमध्ये त्यांच्या सुमारे वीस लाखांच्या ठेवी आहेत. पद्माळे, कवलापूर, मालगाव, बेडग येथे त्यांच्या नावावर जमिनी आहेत.
राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश पाटील यांची जंगम मालमत्ता ४ कोटी ५५ लाख असून, त्यांच्या पत्नीच्या नावे ४ कोटी ४४ लाखांची जंगम मालमत्ता आहे. त्याचबरोबर त्यांची स्थावर मालमत्ता ४६ लाख ५० हजारांची आहे. जवळपास चार कोटींची त्यांची गुंतवणूक आहे. त्यांच्या कुटुंबाकडे ५१० ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत. सांगली, सौदी (ता. अथणी) येथे त्यांच्या नावावर जमीन आहे. विविध बँकांचे त्यांच्यावर ३ कोटी ५३ लाखांचे कर्जही आहे.
शिवसेनेचे उमेदवार पृथ्वीराज पवार यांची जंगम मालमत्ता ३ लाख २४ हजार असून, स्थावर मालमत्ता ७४ लाख ७७ हजार आहे. त्यांच्या पत्नीच्या नावे स्थावर मालमत्ता ७० लाखांची आहे. त्यांची सर्वोदय कारखाना, डेअरी आदी ठिकाणी गुंतवणूक आहे. त्यांच्यावर ४ लाख ६४ हजारांचे कर्जही आहे. (प्रतिनिधी)