सांगलीत रविवारी पत्रकारांचा मूक मोर्चा
By Admin | Published: September 30, 2016 12:55 AM2016-09-30T00:55:38+5:302016-09-30T01:33:40+5:30
पत्रकार संरक्षण कायद्याची मागणी : हल्ल्यांविरोधात आंदोलन
सांगली : राज्यातील पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांत दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. त्याचबरोबर अनेक पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यासाठी पत्रकार संरक्षण कायदा करण्यात यावा व हल्लेखोरांवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी रविवार, दि. २ आॅक्टोबरला गांधी जयंतीस सांगलीत पत्रकारांच्यावतीने मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.
पत्रकार संरक्षण कायदा करण्यात यावा, या मागणीकडे सरकारकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने सर्व पत्रकारांच्यावतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यातही पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीच्यावतीने २ आॅक्टोबरला मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात जिल्ह्यातील सर्व दैनिकांचे संपादक, आवृत्तीप्रमुख, ज्येष्ठ पत्रकार, ग्रामीण पत्रकार, मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे पत्रकार आणि सर्वच पत्रकार संघटनांचे पदाधिकारी, सदस्य सहभागी होणार आहेत.
रविवारी दुपारी बारा वाजता येथील काँग्रेस भवनजवळच्या शासकीय विश्रामधाम येथून मूक मोर्चाची सुरुवात होणार आहे. पुढे स्टेशन चौकात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा जाणार आहे. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले जाणार आहे.
त्यानंतर गांधी जयंतीनिमित्त महापालिकेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात सर्व पत्रकार सहभागी होणार आहेत. या मोर्चात जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)