सांगलीत मंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास दुग्धाभिषेक, दूध दराबाबत निदर्शने, शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 07:34 PM2018-01-10T19:34:13+5:302018-01-10T19:42:28+5:30
गाय व म्हैशीच्या दूध दरातील वाढ अचानक रद्द झाल्याच्या प्रश्नावर बुधवारी शेतकरी संघटनेने दुग्धविकासमंत्री व कृषी मंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास दुग्धाभिषेक घालून निदर्शने केली. यावेळी विनापरवाना आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली.
सांगली : गाय व म्हैशीच्या दूध दरातील वाढ अचानक रद्द झाल्याच्या प्रश्नावर बुधवारी शेतकरी संघटनेने दुग्धविकासमंत्री व कृषी मंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास दुग्धाभिषेक घालून निदर्शने केली. यावेळी विनापरवाना आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली.
गाय व म्हैशीच्या दूध दरात वाढ करण्याचे आदेश शासनाने दूध संस्थांना देऊनही, पुन्हा दरात कपात करण्यात आली आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघटनेने काही दिवसांपूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना दुधाची बाटली भेट दिली होती.
बुधवारी अचानक शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. तेथे जोरदार निदर्शने केली. कार्यकर्त्यांनी दुग्धविकासमंत्री व कृषी मंत्र्यांचे प्रतीकात्मक पुतळे आणले होते. त्यावर दुधाचा अभिषेक घालण्यात आला. यावेळी पोलिसांनी त्यांची धरपकड केली. पोलिसांनी मुख्य कार्यकर्त्यांना अटक करून प्रतिबंधात्मक कारवाई केली.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, राज्य शासनाने गाईच्या दुधाला प्रतीलिटर २ रुपये आणि म्हैशीच्या दुधाला ३ रुपये दरवाढ देण्याचे आदेश दूध संस्थांना दिले होते. त्यानंतर दूध उत्पादक शेतकऱ्यांना कशी तरी महिनाभर दरवाढ देण्यात आली. त्यानंतर अचानक सहकारी व खासगी दूध संघ व संस्थांनी गाईच्या व म्हैशीच्या दुधाचे दर २ ते ३ रुपयांनी कमी केले.
याबाबत दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला. दर कमी करणारे संघ व संस्थांवर कारवाई करण्यास भाग पाडले. मात्र त्यानंतर राज्यातील दूध संघ व संस्थांच्या दबावाला बळी पडून या कारवाईला त्यांनी स्थगिती दिली आहे. यामुळे नुकसान होत आहे.
आंदोलनात संजय कोले, सुनील फराटे, रावसाहेब दळवी, शीतल राजोबा, रामचंद्र कणसे, मोहन परमणे, अल्लाउद्दीन जमादार, वसंत भिसे, एकनाथ कापसे, अण्णा पाटील, सदाशिव पाटील, अण्णासाहेब हरताळे, शीतल पाटील सहभागी होते.
दर कमी केल्यामुळे उत्पादकांचा तोटा वाढत आहे. दूध खरेदी दर कमी करताना याच संस्थांनी ग्राहकांना विक्री दरात कोणतीही कपात केली नाही. दूध उत्पादकांकडून ग्राहकांपर्यंत दूध पोहोचेपर्यंत मध्यस्थांचे कमिशन मिळून एकूण ८ ते १० रुपये खर्च होतो.
दूध खरेदी दर व सर्व खर्च मिळून एकूण २८ ते ३0 रुपये होतात. मात्र ग्राहकांना तेच दूध ४० ते ४५ रुपयांना विकले जाते. शेतकºयांचा तोटा सहन करणार नाही, असा इशाराही यावेळी दिला.