सांगलीच्या हळदीला जीआय मानांकन फेटाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 11:10 PM2018-06-11T23:10:30+5:302018-06-11T23:10:30+5:30
हळदीचे कमी क्षेत्र आणि करक्युमिन तेलाचे प्रमाण ३ ते ४ टक्के असल्यामुळे हळदीला भौगोलिक मानांकन (जीआय) मिळण्यासाठी सांगली जिल्ह्यातून केंद्र शासनाकडे गेलेला प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे.
अशोक डोंबाळे
सांगली : हळदीचे कमी क्षेत्र आणि करक्युमिन तेलाचे प्रमाण ३ ते ४ टक्के असल्यामुळे हळदीला भौगोलिक मानांकन (जीआय) मिळण्यासाठी सांगली जिल्ह्यातून केंद्र शासनाकडे गेलेला प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. वर्धा जिल्'तील वायगावी हळदीमध्ये करक्युमिन तेलाचे प्रमाण सहा टक्के असल्यामुळे तिला जीआय मानांकन मिळाले आहे. सांगलीच्या हळदीची वैशिष्ट्ये मांडण्यामध्ये शासकीय यंत्रणा कमी पडल्यामुळे, मोठी बाजारपेठ असूनही मानांकनापासून दूर राहावे लागले आहे.
भौगोलिक मानांकन (जिआॅग्रॉफिकल इंडेक्स : जी.आय.) हा दर्जा मिळावा म्हणून पुणे येथील जीएमजीसी या संस्थेने राज्यातील दहा कृषी उत्पादनांची नोंद केली होती. यामध्ये सांगलीच्या हळदीचा आणि बेदाण्याचा समावेश होता. बेदाण्यास तात्काळ जीआय मानांकन मिळाले. त्यात द्राक्षबागायतदार संघाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून प्रस्ताव गेल्यापासून द्राक्षबागायतदार संघानेच पुढाकार घेतला होता. सर्व त्रुटी दूर केल्यामुळे सांगलीच्या बेदाण्याला जागतिक बाजारपेठेत ओळख मिळाली आहे.
शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) येथील काही शेतकऱ्यांनी हळदीला जीआय मानांकन मिळण्यासाठी प्रयत्न केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केल्यानंतर ४ जुलै २०१६ रोजी तो केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला. शेतकºयांच्या प्रयत्नाला कृषी उत्पन्न बाजार समिती अथवा चेंबर आॅफ कॉमर्सने पाठबळ देण्याची गरज होती. मात्र या दोन्ही संस्थांच्या पदाधिकाºयांनी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. त्यावरून मतभेद झाले. हळदीला आयएसओ मानांकन घेतले असून, जीआय मानांकनाचा आम्हाला काय फायदा, असा सवाल काही व्यापाºयांनी उपस्थित केला.
त्यामुळे सांगलीत हळदीची वर्षाला हजारो कोटींची उलाढाल होऊनही जीआय मानांकनाच्या स्पर्धेतून येथील हळद बाहेर पडली आहे. या स्पर्धेत वर्धा जिल्'तील वायगावी हळदीने बाजी मारली आहे. या हळदीची सांगली, सेलम किंवा जळगावी हळदीपेक्षा वेगळी गुणवैशिष्ट्ये असल्याची मांडणी तेथील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. यात करक्युमिन तेलाचे प्रमाण सहा टक्के असून हस्तोद्योगातून ते प्रमाण आठ टक्क्यापर्यंत जाईल, असा दावाही त्यांनी केला आहे. यामुळेच त्या हळदीला जीआय मानांकन मिळाले.
मानांकनामध्ये अडचणी काय?
जीआय मानांकन देताना प्रामुख्याने तेथील पिकाचे क्षेत्र आणि त्या पिकाच्या वैशिष्ट्यांचा विचार केला जातो. या दोन्ही निकषांमध्ये सांगलीची हळद मागे पडली आहे. वर्धा, चंद्रपूर, हिंगोली, नांदेड, सातारा, लातूर जिल्'ांपेक्षाही सांगली जिल्'ाचे हळदीचे क्षेत्र कमी आहे. जिल्'ात सध्या केवळ एक हजार हेक्टर क्षेत्र आहे. शिवाय तिच्यात करक्युमिन तेलाचे प्रमाण ३ ते ४ टक्केच आहे. वर्धा जिल्'ातील समुद्रपूर तालुक्यातील वायगाव हे गाव ८० टक्के हळदीचे उत्पादन घेत आहे. त्या हळदीत करक्युमिनचे प्रमाण ६ ते ८ टक्के आहे. याच हळदीने आता इतर वाणांच्या हळदीला मागे टाकून मानांकन मिळविले आहे.
मानांकन मिळविण्यासाठी अजूनही प्रयत्न : गणेश हिंगमिरे
जिआॅग्राफिकल इंडेक्स (जी.आय.) हा दर्जा मिळावा म्हणून पुणे येथील जीएमजीसी ही संस्था प्रयत्न करीत आहे. जी.आय. मानांकन तज्ज्ञ प्रा. गणेश हिंगमिरे म्हणाले की, मानांकन प्राप्त झाल्यानंतर सांगलीच्या हळदीला आंतरराष्ट्रीय बाजारात दाखल होण्याची संधी मिळणार आहे. केंद्र शासनाकडून मानांकन मिळाल्यामुळे आर्थिक उलाढालीवरही त्याचा परिणाम होणार आहे. सांगलीच्या हळदीलाही जी.आय. मानांकन मिळालेच पाहिजे. त्यादृष्टीने आमचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत. लवकरच आमच्याही लढ्याला यश मिळणार आहे.
सांगलीच्या प्रस्तावात काय म्हटले?
सांगलीच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून सादर केलेल्या प्रस्तावात म्हटले आहे की, भारतातील ८० टक्के हळदीचा व्यापार सांगलीमधून होतो. देशातील दरही सांगली बाजार समितीतील दरावरच अवलंबून असतो. केशरी रंगामुळे देशात ही हळद प्रसिध्द आहे. याच रंगामुळे मसाले उत्पादकांमध्ये तिला मागणी आहे. देशांतर्गत व्यापाराबरोबरच इराण, इराक, सौदी अरेबिया, इंग्लंड, अमेरिका, युरोपपर्यंत ती पोहोचली आहे. भारताला परदेशी चलन मिळवून देण्यात तिचा मोठा वाटा आहे.
सांगलीच्या हळदीची वैशिष्ट्ये...
- हळदीचे आशिया खंडातील सर्वात मोठे व्यापारी केंद्र
- कोरडे व उष्ण हवामानामुळे हळदीला नैसर्गिक गुणधर्म
- जाडी जास्त, साल पातळ असून कंद मोठे, सुरकुत्या कमी
- रंग केशरी, चव थोडीशी कडवट, तिखट