सांगलीवरील पाणी संकट टळले
By admin | Published: June 30, 2016 11:13 PM2016-06-30T23:13:47+5:302016-06-30T23:37:46+5:30
महापालिकेला दिलासा : प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर कृष्णा नदीत आले दोन फूट पाणी
सांगली : तब्बल आठवडाभराच्या प्रतीक्षेनंतर सांगलीच्या कृष्णा नदीत कोयनेतून सोडलेले पाणी पोहोचले. दिवसभरात नदीची पाणीपातळी दोन फुटापर्यंत गेली होती. सांगलीत पाणी पोहोचल्याने शहरावरील पाणी टंचाईचे संकट तात्पुरते टळले आहे.
ऐन पावसाळ्यातच सांगलीतील कृष्णा नदी कोरडी पडली होती. नदीपात्रातील पाणीसाठा कमी झाल्याने सांगली व कुपवाड या दोन शहरांवर पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले होते. महापालिकेने पाटबंधारे विभागाशी संपर्क साधून, कोयनेतून पाणी सोडण्याची विनंती केली होती. पण गेले तीन दिवस हे पाणी सांगलीपर्यंत पोहोचले नव्हते. त्यामुळे महापालिकेची चिंता वाढली होती. अखेर कोयनेतून सोडलेले पाणी सांगलीच्या बंधाऱ्यापर्यंत गुरुवारी पोहोचले. दिवसभरात नदीपात्रात दोन फूट पाणी होते. आणखी दोन ते तीन दिवसात पाणीसाठा वाढणार आहे. तेव्हा सांगली बंधाऱ्यावरून पाणी वाहून जाईल. त्यामुळे सध्या नदीपात्रात असलेले दूषित पाणी वाहते होईल, असा दावा पाणीपुरवठा विभागाने केला आहे.
सांगलीत कोयनेचे पाणी आल्याने महापालिकेने सुटकेचा नि:श्वास टाकला. आणखी महिनाभर तरी पाण्याची कमतरता भासणार नाही. महापालिकेने पाटबंधारे विभागाशी ताळमेळ साधला असून भविष्यातील पाण्याचेही नियोजन केले आहे. सध्या तरी सांगली व कुपवाड या दोन शहरांवरील पाणी टंचाईचे संकट तूर्तास टळले आहे.
पाणी टंचाईचे संकट निर्माण होताच पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शीतलनाथ उपाध्ये यांनी बुधवारी जॅकेवल परिसरात काही उपाययोजना केल्या होत्या. जॅकवेलमध्ये दीड फूट खोल च्छिद्र पाडून तेथील पाण्याची पातळी वाढविण्यात आली होती. शिवाय जेसीबीच्या साहाय्याने नदीपात्रातील पाणी जॅकवेलपर्यंत आणण्यात पाणीपुरवठा विभागाला यश आले होते. त्यामुळे बुधवारी सायंकाळनंतर पाणी उपसाचे दोन्ही पंप सुरू झाले होते. या पर्यायामुळे सांगली व कुपवाडला पाणी कमी पडणार नाही, असा दावाही पाणीपुरवठा विभागाने केला होता. (प्रतिनिधी)
बुधवारी सायंकाळनंतर महापालिकेच्या जॅकवेलमधील दोन्ही पंप सुरू करण्यात आले होते. या दोन्ही पंपातून दर तासाला ३० लाख लिटर पाण्याचा उपसा केला जातो. पण गेल्या तीन दिवसांपासून पाणी पुरवठ्यावर परिणाम झाल्याने गुरुवारीही काही भागात अपुरा पुरवठा झाला. यशवंतनगर, बालाजीनगर, चिन्मय पार्क परिसरात कमी दाबाने पाणी आले. शुक्रवारपासून पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे कार्यकारी अभियंता उपाध्ये यांनी सांगितले.