सांगलीच्या पाण्यात सांडपाण्याची मात्रा!

By admin | Published: November 4, 2015 11:10 PM2015-11-04T23:10:37+5:302015-11-04T23:57:42+5:30

महापालिकेसमोर प्रदूषण विभागही हतबल : ‘कृष्णे’त रोज ५७ दशलक्ष लिटर मैलामिश्रित पाणी

Sangli's water seized! | सांगलीच्या पाण्यात सांडपाण्याची मात्रा!

सांगलीच्या पाण्यात सांडपाण्याची मात्रा!

Next

अशोक डोंबाळे - सांगली--महापालिका क्षेत्रासह वाळवा, पलूस, मिरज तालुक्यांतील दीडशेवर गावांच्या सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया होत नसल्याने दररोज ५७ दशलक्ष लिटर दूषित पाणी कृष्णा नदीत मिसळत आहे. परिणामी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्राला दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे सणासुदीच्या दिवसांत साथीचे विकार बळावले आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला वर्षभरात सात कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. पण, महापालिकेकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
सांगलीच्या शेरीनाल्याच्या प्रश्नावरून विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुका गाजल्या आहेत. पण नागरिकांच्या आरोग्याशी निगडित दूषित पाण्याचा प्रश्न मात्र गेल्या तीस वर्षात सुटलेला नाही. गेल्या आठवड्यात कृष्णा नदीतील मासे मृत झाल्यामुळे दूषित पाण्याचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला. त्यानंतर मंगळवारीही शेरीनाल्याद्वारे शहरातून येणारे सांडपाणी वसंतदादा स्मारकाच्या ठिकाणी कृष्णा नदीत मिसळत असल्याचे दिसून आले. या पाण्याला प्रचंड दुर्गंधी येत असून, कोणतीही प्रक्रिया न करता ते थेट नदीत मिसळत आहे. त्यामुळे उपसा होणाऱ्या पाण्याबरोबरच सांडपाण्याची मात्राही लागू झाली आहे.

‘जीवन प्राधिकरण’चा भोंगळ कारभार
शेरीनाला शुद्धीकरण प्रकल्पाचा मूळ खर्च २५ कोटी २४ लाख ८८ हजार रुपये होता. तो ३४ कोटी ९५ लाखांपर्यंत पोहोचला आहे. योजनेचे काम पूर्ण झाले असले तरी, अजूनही एक कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता आहे. योजना कार्यान्वित होईपर्यंत ३६ कोटींवर खर्च जाईल. केंद्र शासनाच्या मदतीतून हाती घेतलेली शुद्धीकरणाची योजना शेवटच्या टप्प्यात येऊन रखडली आहे. झालेली कामेही दर्जेदार नसल्यामुळे योजना नियमित कार्यान्वित ठेवली जात नाही. याला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचा कारभारच जबाबदार असल्याचा आरोप महापालिकेकडून होत आहे.

नोटिसा, कारवाईनंतरही महापालिका प्रशासनाचे उपाययोजनांकडे दुर्लक्ष


वसंतदादा स्मारक, सांगलीवाडी येथील सिध्दार्थनगर परिसर, हरिपूर नाला आणि मिरज येथे कृष्णा नदीत शहरातील २७ दशलक्ष लिटर सांडपाणी मिसळत आहे. शिवाय, वाळवा, मिरज आणि पलूस तालुक्यातील १६० गावांचे दररोज ३०.४५ दशलक्ष लिटर सांडपाणीही कृष्णा नदीत मिसळत आहे. ते पाहून कोणीही हे पाणी पिण्याचे धाडस करणार नाही. नदीतून पाणी उचलल्यानंतर महापालिकेकडून त्याचे शुध्दीकरणही नीट होत नाही.
महापालिकेने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे दहा लाखाची बँक गॅरंटी ठेवली होती. तथापि दूषित पाण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हे दहा लाख रुपयेही मंडळाने जप्त केले आहेत. याप्रकरणी दि. ३ मार्चरोजी आयुक्तांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. तरीही महापालिकेने उपाययोजना केल्या नाहीत. आता कोल्हापूरच्या विभागीय प्रादेशिक अधिकाऱ्यांकडे कारवाईसाठी प्रस्ताव पाठविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

सध्या महापालिकेचे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. गेल्या आठ दिवसांपासून शेरीनाल्याचे पाणी नदीत मिसळत असल्यामुळे नदीतील मासेही मृत झाले आहेत. मात्र महापालिकेने शेरीनाल्याचे पाणी थांबविण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. प्रदूषण नियंत्रण विभागाने महापालिकेला पुन्हा कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. वर्षभरात अशा सात कारणे दाखवा नोटिसा बजाविल्या आहेत.

Web Title: Sangli's water seized!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.