सांगलीत तरुणाची आत्महत्या, रेल्वे रुळाच्या मध्यभागी मांडी घालून बसला, रूळ ओलांडताना वृद्धेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 11:43 AM2017-12-01T11:43:41+5:302017-12-01T11:49:55+5:30
सांगली येथे घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये रेल्वेची धडक बसल्याने एका महिलेसह दोघेजण ठार झाले. विश्रामबाग रेल्वे फाटक ते स्थानकादरम्यान गुरुवारी सकाळी या घटना घडल्या. मंगल रघुनाथ बेंद्रेकर (वय ५२, रा. कृष्णाली वसाहत, विश्रामबाग) व शशिकांत आनंदराव साळुंखे (२५, कांचनपूर, ता. मिरज) अशी मृतांची नावे आहेत.
सांगली : येथे घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये रेल्वेची धडक बसल्याने एका महिलेसह दोघेजण ठार झाले. विश्रामबाग रेल्वे फाटक ते स्थानकादरम्यान गुरुवारी सकाळी या घटना घडल्या. मंगल रघुनाथ बेंद्रेकर (वय ५२, रा. कृष्णाली वसाहत, विश्रामबाग) व शशिकांत आनंदराव साळुंखे (२५, कांचनपूर, ता. मिरज) अशी मृतांची नावे आहेत.
मंगल बेंद्रेकर या सकाळी अकरा वाजता विश्रामबाग रेल्वे फाटकाजवळील स्वामी समर्थ मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. दर्शन घेतल्यानंतर त्या पावणेबारा वाजता घरी निघाल्या होत्या. त्यावेळी यशवंतपूर-जोधपूर रेल्वे जाणार असल्याने रेल्वे फाटक बंद करण्यात आले होते. तरीही त्यांनी फाटक ओलांडून जाण्याचा प्रयत्न केला.
याचदरम्यान भरधाव वेगाने आलेल्या यशवंतपूर-जोधपूर रेल्वेची त्यांना जोराची धडक बसली. यामध्ये त्या उडून पडल्याने जागीच ठार झाल्या. मिरज रेल्वे पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. बेंद्रेकर यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
शशिकांत साळुंखे हा मिरज एमआयडीसीतील एका कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करीत होता. गेले दोन दिवस तो कामावरही गेला नाही, तसेच घरीही गेला होता. त्यामुळे नातेवाईक त्याचा शोध घेत होते. सकाळी साडेआठ वाजता तो विश्रामबाग स्थानकावर फिरत होता.
यावेळी पुणे-मिरज ही मालवाहतूक रेल्वे येताना त्याला दिसताच तो रुळाच्या मध्यभागी मांडी घालून बसला. चालकाने हॉर्न वाजवून त्याला हटविण्याचा प्रयत्न केला. तरीही तो उठला नाही. शेवटी त्याला रेल्वेची जोरात धडक बसली. तो उडून रुळाकडेला पडला. नागरिकांनी धाव घेतली व त्याला पाणी पाजले. पण काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला.
हद्दीचा वाद : मृतदेह पाच तास स्थानकावर
रेल्वेची धडक बसल्यानंतर शशिकांत साळुंखे जिवंत होता. नागरिकांनी त्याला उचलून प्लॅटफार्मवर ठेवले. पण पाणी पाजताच त्याचा मृत्यू झाला. ही घटना रेल्वेच्या हद्दीत होती. परंतु रेल्वे पोलिसांनी हात झटकले. यावरुन रेल्वे व विश्रामबाग पोलिसांत जोरदार वाद झाला. या वादामुळे मृतदेच पाच तास स्थानकावर पडून होता. शेवटी विश्रामबाग पोलिसांनी पंचनामा करुन पुढील कार्यवाही केली.