सांगलीत दलित महासंघाचा उंट, शेळीसह महापालिकेवर मोर्चा
By शीतल पाटील | Published: February 21, 2023 09:06 PM2023-02-21T21:06:47+5:302023-02-21T21:08:00+5:30
मालमत्ता करप्रणालीच्या चौकशीची मागणी
सांगली : महापालिकेच्या मालमत्ता कर प्रणालीची चौकशी करावी. भ्रष्टाचार आढळल्यास संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, घरपट्टी पूर्ण माफ करावी यासह अन्य मागण्यांसाठी मंगळवारी दलित महासंघाच्या वतीने उंट, शेळीसह महापालिकेवर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली.
दलित महासंघाचे राज्य संपर्क प्रमुख उत्तम मोहिते, जिल्हाध्यक्षा वनिता कांबळे, जिल्हा संपर्क प्रमुख महेश देवकुळे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी कर संकलन अधिकारी तथा सहायक आयुक्त नितीन शिंदे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, कोरोना व महापुरामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. त्यात महापालिकेने थकीत घरपट्टीपोटी मालमत्ता जप्ती, नळ कनेक्शन तोडण्याची कार्यवाही हाती घेतली आहे. आधीच आर्थिक स्थितीमुळे नागरिक हैराण असताना पालिकेकडून चुकीच्या पद्धतीने कर आकारणी करण्यात आली आहे. याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली आहे. या मोर्चात प्रवीण वारे, अजित आवळे, सचिन मोरे, मारुती भोसले, सागर कांबळे, महावीर चंदनशिवे, प्रकाश वाघमारे, तेजस मोरे, सोनाली मोहिते यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते.