सांगलीत रेल्वेच्या आरक्षित तिकीट विक्रीचा विक्रम; सहा महिन्यात केवळ सात गाड्यांमधून ५९ हजार विक्री
By अविनाश कोळी | Published: November 21, 2023 08:48 PM2023-11-21T20:48:14+5:302023-11-21T20:48:46+5:30
यात वातानुकूलीत बोगीतील महाग तिकिटांच्या विक्रीचाही विक्रम नोंदला गेला आहे.
सांगली : दररोज केवळ सात एक्स्प्रेस गाड्यांना थांबा असतानाही सांगलीच्या रेल्वे स्थानकावरून गेल्या सहा महिन्यात ५९ हजारांवर आरक्षित तिकिटांची विक्री झाली आहे. यात वातानुकूलीत बोगीतील महाग तिकिटांच्या विक्रीचाही विक्रम नोंदला गेला आहे.
नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांना माहितीच्या अधिकारातून आकडेवारी मिळाली. एप्रिल ते सप्टेंबर २०२३ या सहा महिन्यात आरक्षित तिकिटांचा हा विक्रम नोंदला गेला आहे. एसी फर्स्ट क्लास कोच असणाऱ्या फक्त ३ गाड्या सांगली रेल्वे स्टेशनवर थांबतात. या ३ गाड्यांमधून सांगली रेल्वे स्थानकावर ९०० तिकिटे ६ महिन्यात विकली गेली आहेत.
या गाड्यांनाही सांगलीत थांबा हवा
सांगली स्थानकावरून काही लांब पल्ल्याच्या नवीन गाड्या सुरू केल्या, तसेच सध्या सुरू असणाऱ्या चंडीगड - बंगळुरू संपर्क क्रांती व निजामुद्दीन-यशवंतपूर संपर्क क्रांती या गाड्यांना सांगली स्थानकावर थांबा दिल्यास तिकिटांची मोठी विक्री होऊ शकते. तसेच १५ किलोमीटर दूर मिरज स्टेशनवर जाऊन रेल्वे गाड्या पकडण्यासाठी सांगली जिल्ह्यातील लोकांना होणारा त्रासदेखील कमी होईल, असे मत नागरिक मंचने व्यक्त केले आहे.