अध्यक्षपदी संग्रामसिंह
By admin | Published: March 22, 2017 12:12 AM2017-03-22T00:12:44+5:302017-03-22T00:12:44+5:30
जिल्हा परिषदेवर भाजपचीच सत्ता : उपाध्यक्षपदी शिवसेनेचे सुहास बाबर
सांगली : रयत विकास आघाडी, शिवसेना, अजितराव घोरपडे गट, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पाठिंब्यावर जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्तेला सुरुंग लावत भाजपने पहिल्यांदाच झेंडा फडकविला. मंगळवारी भाजपचे संग्रामसिंह देशमुख यांची अध्यक्षपदी, तर शिवसेनेचे सुहास बाबर यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. त्यांनी अनुक्रमे काँग्रेसचे सत्यजित देशमुख आणि राष्ट्रवादीचे चंद्रकांत पाटील यांच्यावर दहा मतांनी मात केली. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी केली.
जिल्हा परिषदेत ६० सदस्यसंख्या असून, २५ जागा जिंकून भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. त्याखालोखाल राष्ट्रवादीकडे १४, काँग्रेस १०, रयत विकास आघाडी ४, शिवसेना ३, अजितराव घोरपडे गट २, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अपक्ष प्रत्येकी एक असे संख्याबळ आहे. निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच होती. शिवसेना आणि रयत विकास आघाडी ‘किंगमेकर’ ठरले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष
आ. मोहनराव कदम आणि राष्ट्रवादीचे नेते आ. जयंत पाटील यांनी सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, तो अयशस्वी ठरला. रयत विकास आघाडी, शिवसेना आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्याशी दोन्ही गटांची बोलणी चालू होती. रविवारी रयत आघाडीने भाजपला पाठिंबा जाहीर केला. सोमवारी रात्री शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनीही आपल्या तीन सदस्यांचा पाठिंबा दिल्यामुळे भाजप बहुमतापर्यंत पोहोचला. खा. राजू शेट्टी समर्थक एक आणि घोरपडे गटाच्या दोन सदस्यांनीही भाजपच्याच पारड्यात मत टाकले.
मंगळवारी जिल्हा परिषदेत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यावेळी उपस्थित होते. अध्यक्षपदासाठी भाजपकडून संग्रामसिंह देशमुख यांच्याविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सत्यजित देशमुख, तर उपाध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे बाबर विरुद्ध काँग्रेस आघाडीचे चंद्रकांत पाटील यांनी अर्ज दाखल केले. निवडीसाठी दुपारी तीन वाजता विशेष सभा घेण्यात आली. हात उंचावून मतदान घेण्यात आले. मतदानावेळी संग्रामसिंह देशमुख आणि सुहास बाबर यांना प्रत्येकी ३५ मते, तर सत्यजित देशमुख व चंद्रकांत पाटील यांना काँग्रेस-राष्ट्रवादी व अपक्षाची मिळून २५ मते मिळाली. दहा मतांनी भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांचा विजय झाला. जिल्हा परिषदेतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या १९६२ पासूनच्या सत्तेला भाजपने मित्रपक्ष व आघाड्यांच्या माध्यमातून सुरुंग लावला. निवडीची घोषणा होताच भाजपच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांची जिल्हा परिषदेत गर्दी झाली. रयत विकास आघाडीचे नेते, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजयकाका पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, आ. विलासराव जगताप, आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी आ. राजेंद्रअण्णा देशमुख, गोपीचंद पडळकर, माजी आ. दिनकर पाटील, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, दीपक शिंदे-म्हैसाळकर, रयत विकास आघाडीचे गौरव नायकवडी आदी यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
संजयकाकांनी डोंगरेंना रोखले
अध्यक्षपदासाठी सकाळी अकरा ते बारा या वेळेत अर्ज भरण्याची मुदत होती. मिरजेतील एका फार्महाऊसवर संग्रामसिंह देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्यांचा अर्ज दाखल केल्यानंतर दुसरे इच्छुक शिवाजी डोंगरे यांनीही अर्ज भरण्याचा निर्णय घेतला. पक्षाकडून देशमुख यांचा एकमेव अर्ज राहिला पाहिजे, असा भ्रमणध्वनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खा. संजयकाका पाटील यांना केला. त्यामुळे संजयकाकांनी डोंगरे यांना अर्ज न भरता माघारी बोलावले. पावणेबाराच्या सुमारास डोंगरे पत्नीसह अर्ज भरण्यासाठी सभागृहात दाखल झाले.