बिहारी हात फुलवताहेत सांगलीची बागायत; डाळिंब, द्राक्षपट्ट्यात गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:22 AM2021-01-09T04:22:21+5:302021-01-09T04:22:21+5:30
सांगली : सिंचन योजनांमुळे जिल्ह्यात बागायती क्षेत्र वाढले, तशी शेतकऱ्यांना मजुरांची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. पाच वर्षांपूर्वीच्या ...
सांगली : सिंचन योजनांमुळे जिल्ह्यात बागायती क्षेत्र वाढले, तशी शेतकऱ्यांना मजुरांची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. पाच वर्षांपूर्वीच्या मजुरीच्या तुलनेत सध्या तीन-चार पटींनी मजुरी वाढली आहे. त्यामुळे शेतकरी यांत्रिकीकरणाकडे वेगाने वळला आहे. त्याशिवाय परप्रांतीय मजुरांची गर्दीही जिल्ह्यात वाढली आहे.
पुरुष मजुराला सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कामासाठी ४५० रुपये द्यावे लागत आहेत. याच कामासाठी महिला मजूर २५० रुपये घेत आहे. बडे शेतकरी जादा पैसे देऊन मजूर खेचत असल्यानेही मजुरीत वाढ होत गेली आहे.
याला पर्याय म्हणून यंत्रे येत असली तरी काही विशिष्ट कामांना मजुरांशिवाय गत्यंतर नाही. यावर उपाय शोधताना शेतकरी चक्क बिहार, उत्तर प्रदेशात पोहोचले आहेत. मिरज, तासगाव, खानापूर तालुक्यांचा द्राक्षपट्टा, तसेच जत, आटपाडीच्या डाळिंब पट्ट्यात हजारोंच्या संख्येने परप्रांतीय मजूर राबताना दिसत आहेत. घाऊक स्वरूपात कामे ठेक्याने घेऊन करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना बराच दिलासा मिळाला आहे. ऊसतोडीलाही यंत्रांचा वापर सुरू आहे.
मजुरांच्या जागी ट्रॅक्टर आणि ड्रोनदेखील!
वाढलेली मजुरी, मजुरांची टंचाई यामुळे यांत्रिकीकरण झाले. उसाच्या भरणीपासून तोडीपर्यंत सर्व कामांसाठी यंत्रे वापरली जाताहेत. शाळू, सोयाबीन, मक्याची पेरणी, द्राक्षाची औषध फवारणी, हळदीची भरणी, पाचटाचे गठ्ठे बांधणे, सरी सोडणे, ठिबकसाठी औषध मिसळणे ही सारी कामे ट्रॅक्टर आणि ड्रोनद्वारे होताहेत.
फक्त भांगलणीला मजूर
भांगलणी वगळता अन्य बहुतांशी कामे यंत्राने सुरु झाली आहेत. मोठ्या पिकांत मात्र यंत्रे चालत नसल्याने मजुरांचा वापर करावा लागतो.
मोठ्या शेतकऱ्यांना मजुरांच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. द्राक्षबागेच्या कामासाठी कर्नाटकातून मजूर आणावे लागतात. जादा पगारासह त्यांच्या वाहतुकीचाही खर्च करावा लागतो. यांत्रिकीकरण झाले असले तरी काही ठराविक कामांसाठी मजुरांशिवाय पयार्य नाही.
- दिलीप बुरसे, बागायतदार, बेडग
द्राक्षबागेसाठी बिहारी मजूर उपलब्ध करावे लागले. स्थानिक मजुरांचे पगार परवडत नाहीत, शिवाय ते नियमितपणे कामही करत नाहीत. बिहारी कामगार अंगावर घेऊन वेळेत कामे पूर्ण करतात. त्यामुळे सोनी, भोसे भागात हजारोंच्या संख्येने उत्तर प्रदेश व बिहारचे मजूर आम्ही आणलेत.
- सुरेश नरुटे, शेतकरी, सोनी
मोठ्या शेतकऱ्यांनी मजूर मिळविण्यासाठी पगार वाढवत नेले, त्याचा त्रास छोट्या शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. चार-पाचशे रुपये मजुरी देणे त्यांना परवडत नाही. शेतीची कामे घरातूनच करावी लागतात. तरुणवर्ग शेतमजुरीला येत नसल्यानेही मजूर मिळणे मुश्किल झाले आहे.
- विष्णू पाटील, शेतकरी, सांगलीवाडी