संजयकाकांनी उसाची बिले थकविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:20 AM2021-06-06T04:20:35+5:302021-06-06T04:20:35+5:30
सांगली : खासदार संजयकाका पाटील यांच्या यशवंत शुगर (नागेवाडी, ता. खानापूर), एसजीझेड व एसजीए शुगर (तुरची, ता. तासगाव) या ...
सांगली : खासदार संजयकाका पाटील यांच्या यशवंत शुगर (नागेवाडी, ता. खानापूर), एसजीझेड व एसजीए शुगर (तुरची, ता. तासगाव) या दोन साखर कारखान्यांनी जानेवारीपासून शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्याचेही उसाचे बिल दिले नाही. याच्या निषेधार्थ सोमवार, दि. ७ जून रोजी तासगाव येथे रास्ता रोको आणि सांगलीत मार्केट यार्डातील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला.
ते म्हणाले की, यशवंत शुगर, एसजीझेड व एसजीए शुगर हे दोन्ही साखर कारखाने खा. संजयकाका पाटील यांचे आहेत. या कारखान्यांना जानेवारीपासून ऊस घातलेल्या शेतकऱ्यांना काहीच बिल मिळाली नाहीत. वारंवार शेतकरी पैशाची मागणी करूनही मिळत नाहीत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केल्यानंतर पाटील यांनी दि. ३० एप्रिलपर्यंत बिले देण्याचे आश्वासन दिले होते. ३० मे उलटून गेला तरी अद्याप त्यांनी शेतकऱ्यांना बिले दिलेली नाहीत. खरीप हंगामात पेरणीची शेतकऱ्यांची धावपळ चालू असून खते, बियाणे आणि मशागतीसाठी शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत, तरीही पाटील यांच्याकडून शेतकऱ्यांचे पैसे देण्याची मानसिकता नाही. त्यामुळे सर्व शेतकरी तासगाव येथे दि. ७ जून रोजी रास्ता रोको आंदोलन करणार आहेत. सांगलीत संजयकाका पाटील यांच्या मार्केट यार्डातील संपर्क कार्यालयासमोरही ठिय्या आंदोलन करणार आहेत. केंपवाड येथील कारखान्याने पहिले बिलही दिले नसल्यामुळे त्यांच्या कार्यालयासमोरही आंदोलन करण्यात येणार आहे.
आंदोलनाच्या तयारीच्या बैठकीस जोतिराम जाधव, सचिन पाटील, दामाजी दूबल, अशोक खाडे, गुलाबराव यादव, राजेंद्र माने, शशिकांत माने, संदेश पाटील, संदीप शिरोटे, सचिन महाडिक, गोरख महाडिक, माणिक शिरोते, अनिल पाटील, महेश जगताप आदी उपस्थित होते.