संजयकाकांच्या गुगलीने भाजपला धडकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:24 AM2020-12-24T04:24:12+5:302020-12-24T04:24:12+5:30

शीतल पाटील लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापौरपदावरून सत्ताधारी भाजपमध्ये वातावरण तापले असतानाच खासदार संजयकाका पाटील यांच्या गुगलीने इच्छुकांना ...

Sanjay Kaka's googly shocked BJP | संजयकाकांच्या गुगलीने भाजपला धडकी

संजयकाकांच्या गुगलीने भाजपला धडकी

Next

शीतल पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : महापौरपदावरून सत्ताधारी भाजपमध्ये वातावरण तापले असतानाच खासदार संजयकाका पाटील यांच्या गुगलीने इच्छुकांना धडकी भरली आहे. सांगलीतील एका कार्यक्रमात पालकमंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या महापौरपदासाठी हरकत नसल्याची गुगली संजयकाकांनी टाकली. आता संजयकाका पाटील भाजपला साथ देणार की राष्ट्रवादीला हात, याची चर्चा सुरू आहे.

महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत आहे. पण गेल्या अडीच वर्षात भाजपच्या कारभारावर निष्ठावंतांसह आयाराम नगरसेवकही नाराज आहेत. सत्ताधाऱ्यांत ताळमेळ दिसून येत नाही. त्यात पदाच्या अपेक्षांनी नगरसेवकांनाही महत्त्वाकांक्षी बनविले आहे. स्थायी समिती सभापती निवडीवेळीच भाजपची ‘गेम’ होणार होती. पण ऐनवेळी जयंत पाटील व विश्वजित कदम या आघाडीच्या नेत्यांनी हात आखडता घेतल्याने भाजपचा सभापती निवडून आला.

आता महापौर निवडीची चिंता वाढली आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नवा महापौर विराजमान होईल. त्यासाठी भाजपमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी आहे. गटनेते युवराज बावडेकर, निरंजन आवटी, धीरज सूर्यवंशी, स्वाती शिंदे यांच्यासह अनेक दिग्गज नगरसेवकांनी तयारी चालविली आहे. महापालिकेची जबाबदारी असलेल्या सुधीर गाडगीळ व सुरेश खाडे या आमदारद्वयींकडून अद्याप कुणालाच ग्रीन सिग्नल मिळालेला नाही. त्यामुळे इच्छुकांत अस्वस्थता आहे. आता नाही तर कधीच नाही, असे म्हणत काही जणांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्याशी सलगी वाढविली आहे.

त्यात जयंत पाटील यांच्या ‘करेक्ट कार्यक्रमा’ची नेहमीच चर्चा होत असते. आता भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्या वक्तव्याची नव्याने भर पडली आहे. सांगलीतील एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे मैनुद्दीन बागवान यांचा उल्लेख संजयकाकांकडून राहून गेला. यावेळी जयंत पाटील यांनी ‘भावी महापौर’ म्हणून परत नाव घ्या, असे मिश्कीलपणे म्हटले. यावर लगेचच संजयकाकांनी दाद देत बागवान भावी महापौर होणार असतील, तर आपली काही हरकत नाही, असे सांगितले. त्यामुळे कार्यक्रमास उपस्थितीत भाजप नगरसेवक व नेत्यांच्या भुवया उंचावल्या. संजयकाकांनी टाकलेल्या गुगलीने भाजपची चिंता वाढवली आहे.

चौकट

जयंतराव-संजयकाकांची जवळीक

संजयकाकांचा महापालिकेत स्वतंत्र गट नसला तरी काही नगरसेवक त्यांचे नेतृत्व मानतात. सांगली शहरात त्यांची ताकद आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते भाजपमध्ये बेदखल झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या गटात अस्वस्थता आहे. त्यातच जयंत पाटील यांच्याशी त्यांची जवळीक सर्वश्रुत आहे. त्यामुळे आगामी महापौर निवडीत शह-काटशहाचे राजकारण रंगणार आहे.

चौकट

महापालिकेतील पक्षीय बलाबल

भाजप : ४३ (दोन सहयोगी)

काँग्रेस : २०

राष्ट्रवादी : १५

Web Title: Sanjay Kaka's googly shocked BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.