संजयकाकांसमोर आव्हान सिंचन योजना पूर्तीचे : सांगली जिल्ह्यातील प्रकल्पांसाठी ५,२५९ कोटीं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 12:56 AM2018-06-15T00:56:03+5:302018-06-15T00:56:03+5:30

जिल्ह्यातील टेंभू, ताकारी, म्हैसाळ आणि वाकुर्डे बुद्रुक सिंचन योजनांवर ३ हजार ५०९ कोटी रुपये खर्च झाले; मात्र यातून ६५ हजार १६९ हेक्टर क्षेत्राला पाणी मिळाले आहे.

 Sanjay Kankar challenges challenge irrigation scheme: Rs 5,259 crore for projects in Sangli district | संजयकाकांसमोर आव्हान सिंचन योजना पूर्तीचे : सांगली जिल्ह्यातील प्रकल्पांसाठी ५,२५९ कोटीं

संजयकाकांसमोर आव्हान सिंचन योजना पूर्तीचे : सांगली जिल्ह्यातील प्रकल्पांसाठी ५,२५९ कोटीं

Next
ठळक मुद्देवंचित गावांच्या समावेशासह निधी मिळविण्याची गरज

अशोक डोंबाळे ।
सांगली : जिल्ह्यातील टेंभू, ताकारी, म्हैसाळ आणि वाकुर्डे बुद्रुक सिंचन योजनांवर ३ हजार ५०९ कोटी रुपये खर्च झाले; मात्र यातून ६५ हजार १६९ हेक्टर क्षेत्राला पाणी मिळाले आहे. उर्वरित १ लाख ५३ हजार हेक्टर क्षेत्र पाण्यापासून वंचित असून, त्यासाठी ५ हजार २५९ कोटी निधीची गरज आहे. हा निधी मिळविण्यासह वंचित गावांचा समावेश करण्याचे मोठे आव्हान कृष्णा खोरे विकास महामंडळाचे नूतन उपाध्यक्ष खा. संजयकाका पाटील यांच्यासमोर आहे.

कृष्णा खोरेमध्ये सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद या जिल्ह्यांचा समावेश आहे. सिंचन योजनांचा नेहमीच निवडणुकांमध्ये राजकीय स्वार्थासाठी वापर करण्यात आला. निवडणुकांच्या पूर्वसंध्येला आणि निवडणुकांच्या मैदानात सिंचन योजनांच्या श्रेयवादावरून काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपच्या नेत्यांमध्ये कुरघोडीचे राजकारण रंगते. परंतु, प्रत्यक्षात निवडणुका झाल्यानंतर योजना पूर्ण झाल्या काय किंवा बंद पडल्या काय, याचे राजकारण्यांना काहीच देणेघेणे नसते. यात भरडला जातो तो शेतकरीच! हे सिंचन योजनांच्या सद्यस्थितीवर नजर टाकल्यानंतर स्पष्ट होते. कृष्णा खोऱ्यातील सर्वच प्रकल्पांची कामे अपूर्ण आहेत. मुख्य कालव्यांचीच ७० टक्के कामे अपूर्ण असून, धरणग्रस्तांच्या पुनर्वसन आणि भूसंपादनाचा प्रश्न २५ वर्षांपासून ‘जैसे थे’ आहे.

कृष्णा खोरे महामंडळामध्ये सांगली जिल्ह्यातील टेंभू, ताकारी, म्हैसाळ, आरफळ, वाकुर्डे योजनांचा समावेश आहे. ताकारी-म्हैसाळ योजनांच्या कामाची सुरुवात १९८२ मध्ये झाली. सांगली, सोलापूर जिल्ह्यातील एक लाख १७ हजार हेक्टर क्षेत्राला पाणी देण्याचे नियोजन आहे. एक हजार ९८२ कोटींवरून योजनेचा खर्च सध्या चार हजार ९५९ कोटींपर्यंत पोहोचला आहे. आतापर्यंत अडीच हजार कोटी खर्च झाला असून, उर्वरित कामांसाठी तीन हजार कोटींची गरज आहे. जत तालुक्याच्या पूर्व भागातील ४२ गावांचा समावेश करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शेतकºयांचा लढा चालू आहे. पण, प्रत्यक्षात येथील शेतकºयांना न्याय मिळालेला नाही. त्यांना संजयकाका कसा न्याय देणार, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. महामंडळाचे अध्यक्ष हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्यामुळे त्यांच्याकडे दुष्काळग्रस्तांची कैफियत संजयकाका कशापध्दतीने मांडतात, यावरच जिल्ह्याच्या पदरात निधी पडणार आहे. हीच परिस्थिती टेंभू योजनेची असून, आटपाडी, खानापूर, तासगाव तालुक्यातील गावांचा समावेश झाला नाही.

कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटनांद्रे, तिसंगीसह सहा गावांना कोणत्याच योजनेचा लाभ मिळत नसल्यामुळे तेथील शेतकरी आक्रमक झाले असून त्यांचा रोष संजयकाकांना परवडणारा नाही.टेंभू योजनेचे लाभक्षेत्र सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांचे आहे. पण, या योजनेचा सर्वाधिक लाभ सांगली जिल्ह्यातील कडेगाव, खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यांनाच होणार आहे. १९९५ मध्ये योजनेला प्रशासकीय मंजुरी मिळाली असून एक हजार ४१६ कोटींची तरतूद होती. सुधारित खर्चाचा आकडा चार हजार कोटीपर्यंत पोहोचला आहे.

आणखी तीन हजार कोटींची गरज असून ८० हजार ४७२ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. प्रत्यक्षात सध्या दहा हजार २५७ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. उर्वरित ६५ टक्के क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी आणखी किती वर्षे लागणार?, असा प्रश्न दुष्काळग्रस्त शेतकरी करीत आहेत.जिल्ह्यासह कृष्णा खोरे विकास महामंडळाकडील सर्वच योजनांसमोर निधी, जमीन अधिग्रहण आणि वंचित गावांचा समावेश असे प्रश्न आहेत. हे प्रश्न त्वरित सोडविण्याचे संजयकाका पाटील यांच्यासमोर आव्हान आहे.

वाकुर्डेचे दुखणे : उर्वरित क्षेत्राला पाणी कधी?
वाकुर्डे योजनेचे काम १९९८ मध्ये सुरु झाले. १०९.६८ कोटींची योजना आज ७७२ कोटीपर्यंत पोहोचली आहे. अजून ५०० कोटींची गरज आहे. १९ हजार ५०० हेक्टरपैकी केवळ १२०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले असून उर्वरित क्षेत्राला पाणी कधी मिळणार?, असा सवाल शेतकरी उपस्थित करू लागले आहेत.


जिल्ह्यातील सिंचन योजनांचा लेखाजोखा... (रकमा कोटीमध्ये, क्षेत्र हेक्टरमध्ये)
योजना मंजुरी मूळ किंमत सुधारित खर्च झालेला खर्च गरज अपेक्षित सिंचन झालेले सिंचन
टेंभू १९९५ १४१६.५९ ३८२५.८२ २०५४.९० २०९९.२३ ८०४७२ १०२५७
ताकारी १९८२ १९८२.८१ ४९५९.९१ २४०९.७७ २६५९.७७ ३४३९८ १७०७७
म्हैसाळ १९८२ ---- ---- ---- ---- ८२९२२ ३६६३५
वाकुर्डे १९९८ १०९.६८ ७७२ ११२.१५ ५०० १९५०० १२००
एकूण ३५०९.०८ ९५५७.७३ ४५७६.८२ ५२५९ २१७२९२ ६५१६९

Web Title:  Sanjay Kankar challenges challenge irrigation scheme: Rs 5,259 crore for projects in Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली