ईदच्या शुभेच्छांसाठी सांगलीत विद्यमान अन् भावी खासदार एकत्र; संजय पाटील यांच्या टिप्पणीने हास्याची लाट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 06:41 PM2024-04-12T18:41:05+5:302024-04-12T18:41:21+5:30
एक मातीत खेळणारा, तर दुसरा..
सांगली : एरवी निवडणुकीच्या रणांगणात एकमेकांवर आरोपांची राळ उडवत फिरणारे उमेदवार मतपेटीसाठी मात्र खांद्याला खांदा लावून एकत्र आल्याचे मतदारांनी अनुभवले. गुरुवारी सकाळी सांगलीत व मिरजेत ईदगाह मैदानावर विद्यमान आणि भावी खासदार एकत्र आले. त्यांच्यात शेरेबाजीही रंगली.
एरवीदेखील मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी आमदार-खासदार, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी ईदगाह मैदानांवर जातातच. पण यावेळची रमजान ईद ऐन निवडणुकीच्या धामधुमीत आल्याने उमेदवारांसाठी तिचे महत्त्व जास्त होते. मुस्लीम धर्मीयांच्या गठ्ठा मतदानाचे साऱ्याच उमेदवारांना आकर्षण असते. ते खेचून घेण्यासाठी ईदच्या शुभेच्छा वापरण्याचा प्रयत्न केला जातो. आज सकाळी भाजपचे उमेदवार खासदार संजय पाटील, महाविकास आघाडीचे उमेदवार उद्धवसेनेचे चंद्रहार पाटील आणि काँग्रेसकडून इच्छुक असणारे विशाल पाटील सांगलीत ईदगाह मैदानावर एकत्र आले. स्वाभिमानी संघटनेचे इच्छुक महेश खराडे हेदेखील उपस्थित होते.
संजय पाटील आणि चंद्रहार पाटील हे खेटून उभे होते, मात्र विशाल पाटील काही अंतरावर थांबून होते. त्यांच्यामध्ये पोलिस अधीक्षक संदीप घुगे आणि जिल्हा बॅंकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील होत्या. नमाज अदा होईपर्यंत संजय पाटील आणि चंद्रहार पाटील यांच्यात गप्पाही रंगल्या. विशाल पाटील यांचा मात्र विशेष संवाद झाला नाही. यावेळी काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील, जनसुराज्यचे समित कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे पद्माकर जगदाळे, संजय बजाज आदी उपस्थित होते.
एक मातीत खेळणारा, तर दुसरा..
खासदार संजय पाटील यांनी यावेळी केलेल्या टिप्पणीने वातावरण खेळीमेळीचे झाले. विशाल आणि चंद्रहार यांच्याबद्दल ते म्हणाले, एक पैलवान डोक्याने खेळणारा, तर दुसरा मातीत खेळणारा आहे. यावर चंद्रहार यांनी त्यांना हसून दाद दिली. उपस्थितांमध्येही हास्याची लाट उसळली.