संजय पाटील यांच्या उमेदवारीस भाजपा आमदारांचाच विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 06:02 AM2019-03-20T06:02:53+5:302019-03-20T06:02:56+5:30
सांगलीचे भाजप खासदार संजय पाटील यांच्या उमेदवारीस भाजपच्या सर्व आमदारांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.
सांगली : सांगलीचे भाजप खासदार संजय पाटील यांच्या उमेदवारीस भाजपच्या सर्व आमदारांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत पाटील यांच्याविषयीच्या तक्रारींचा पाऊस पडल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हैराण झाले.
या बैठकीला खासदार संजय पाटील यांच्यासह आमदार सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, आ. शिवाजीराव नाईक, आ. अनिल बाबर, आ. विलासराव जगताप, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, लोकसभा पश्चिम महाराष्ट्र समन्वयक मकरंद देशपांडे, सांगली लोकसभा संयोजक शेखर इनामदार आदी उपस्थित होते. बैठकीत सांगली लोकसभा मतदारसंघाच्या रणनीतीविषयी चर्चा सुरू असताना, उमेदवारीवरून बहुतांश पदाधिकारी व सर्व आमदारांनी आक्षेप नोंदविले. उमेदवारी बदलून दिल्यास भाजपमधील नाराजी दूर होऊन भाजपची ही जागा विक्रमी मताधिक्याने निवडून येऊ शकते,
अशी खात्रीही व्यक्त करण्यात
आली.
मुख्यमंत्री फडणवीस, महसूलमंत्री पाटील यांच्यासमोर संजय पाटील यांनी केलेल्या कुरघोड्या आणि गटबाजीचा पंचनामा करण्यात आला. यातून जिल्ह्यातील भाजपमधील गटबाजी आणि खदखद पुन्हा उघड झाली. मात्र उमेदवारीबाबत बैठकीत कोणताच निर्णय किंवा अंदाज दोन्हीही वरिष्ठ नेत्यांनी येथील पदाधिकाऱ्यांना दिला नाही.
सांगली जिल्ह्यात भाजपच्या उमेदवारीवरून पक्षाअंतर्गत वाद गेल्या काही दिवसांत वाढला आहे.
यांचा विरोध
सुरेश खाडे : भाजपा- मिरज
शिवाजीराव नाईक : भाजपा- शिराळा
सुधीर गाडगीळ : भाजपा- सांगली
अनिल बाबर : शिवसेना- खानापूर-आटपाडी
पृथ्वीराज देशमुख : भाजपा जिल्हाध्यक्ष
दोन दिवसांत निर्णय घेऊ - देवेंद्र फडणवीस
संजय पाटील यांनी आपले मत मांडताना सर्वांचा आपल्याबद्दल गैरसमज झाल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांसमोर बाजू मांडली. माझ्या भूमिकेमुळे युतीच्या आमदारांना विधानसभेला फायदा होऊ शकतो, असे स्पष्ट केले. देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांनी याबाबत निर्णय जाहीर केलेला नाही. दोन दिवसांत यावर निर्णय घेऊ, असे सांगितले.
अन्य कुणालाही उमेदवारी द्या
पाटील यांच्याविरोधात पदाधिकारी व आमदारांनी ताकद पणाला लावली आहे. त्यांच्याबद्दल पक्षाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. पाच वर्षांत पाटील यांनी पक्षात कोणालाही विश्वासात घेतले नाही. त्यामुळे त्यांच्याऐवजी अन्य कोणताही उमेदवार पक्षाने द्यावा, अशी मागणी करण्यात आली.