संजय राऊत यांना खासदारकीवरून हटवावे : संभाजीराव भिडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 01:28 PM2020-01-17T13:28:57+5:302020-01-17T13:35:45+5:30
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी छत्रपतींच्या परंपरेचा अवमान केला आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचा बंदोबस्त करावा. त्यांना खासदारकीच्या पदावरून हटवावे, अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी शुक्रवारी केली.
सांगली : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी छत्रपतींच्या परंपरेचा अवमान केला आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचा बंदोबस्त करावा. त्यांना खासदारकीच्या पदावरून हटवावे, अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी शुक्रवारी केली.
दरम्यान शिवप्रतिष्ठानने पुकारलेल्या सांगली बंदला शुक्रवारी उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील मुख्य बाजारपेठेत कडकडीत बंद पाळण्यात आला. येथील मारुती चौकात शिवप्रतिष्ठान व भाजपच्या कार्यकर्त्यांनी निषेध फेरीही काढली.
भिडे म्हणाले की, छत्रपती उदयनराजे महाराज यांच्याविरोधात वक्तव्य करून खा. राऊत यांनी छत्रपतींच्या परंपरेचा अवमान केला आहे. हा प्रकार दुर्दैवी आहे. त्यांच्याकडे पुरावे मागणाऱ्या राऊतांची पातळी काय? त्यांच्या वक्तव्याने सामाजिक वातावरण बिघडले आहे. हा अवमान आम्ही कदापिही सहन करणार नाही. हा बंद शिवसेनेच्याविरोधात नसून खा. राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आहे.
देश टिकण्यासाठी शिवसेनेची गरज आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली. दरम्यान आज के शिवाजी पुस्तकाचे लेखक भाजप नेते जय भगवान गोयल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची मोदीशी केलेली तुलना चुकीचे असल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान, शिवप्रतिष्ठानने पुकारलेल्या सांगली बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. शहरासह जिल्ह्यातील काही गावांतही बंद पाळण्यात आला. सांगलीतील मुख्य बाजारपेठेत कडकडीत बंद पाळण्यात आला. मारुती चौकात शिवप्रतिष्ठानच्यावतीने निषेध फेरी काढण्यात आली.
यावेळी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे, भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ, महापौर संगीता खोत, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, मुन्ना कुरणे, प्रकाश बिरजे, नितीन चौगुले यांच्यासह भाजपचे नगरसेवक, शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.