संजयकाका, जनतेला मामा बनवू नका! : विशाल पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 07:04 PM2018-12-17T19:04:28+5:302018-12-17T19:04:53+5:30
सांगली : नुकताच तीन राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसचा झालेला विजय म्हणजे भाजपची विश्वासार्हता धोक्यात आल्याचे चिन्ह असून, मोदींचा करिष्माही कमी ...
सांगली : नुकताच तीन राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसचा झालेला विजय म्हणजे भाजपची विश्वासार्हता धोक्यात आल्याचे चिन्ह असून, मोदींचा करिष्माही कमी झाला आहे. जनतेचा भाजपबद्दल भ्रमनिरास झाला असून त्यांच्या हुकूमशाहीला जनता कंटाळली आहे. आता परिवर्तनाचे पर्व सुरू झाले असून, लोकसभेला सांगलीत भाजपचा पराभव करणे आपले प्रमुख ध्येय असल्याचा पुनरुच्चार काँग्रेसचे युवानेते विशाल पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.
विकास कामांबद्दल खासदार संजयकाका पाटील जनतेला मामा बनवत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान, लोकसभेच्या उमेदवारीचा निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठीच घेतील, पण आमच्यादृष्टीने उमेदवारीपेक्षा भाजपचा पराभव महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी सांगितले.
पाटील म्हणाले की, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये झालेल्या परिवर्तनामुळे भाजपची लाट ओसरल्याचे स्पष्ट झाले. या निकालातून भाजपची उलटी मोजणी सुरू झाली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला दाम आणि तरुणांच्या हाताला काम हेच लोकांना हवे आहे.
लोकसभा निवडणुकीत जनता भाजपला धडा शिकविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. मोदींचा करिष्मा कमी झाला असल्याने केंद्रात काँग्रेस सत्तेवर येईल. सांगलीची उमेदवारी पक्ष ठरवेल, मात्र भाजपचा दारुण पराभव करणे,हेच आपले ध्येय आहे.
खासदार संजयकाका पाटील जनतेला मामा बनवू लागले आहेत. काका म्हणतात की, सध्या जिल्'ात अकरा हजार कोटीची कामे सुरू आहेत. तसेच गेल्या पन्नास वर्षात जेवढा निधी आला नाही, तेवढा निधी भाजप सरकारने साडेचार वर्षात दिला आहे. मात्र त्यांचा हा दावा हास्यास्पद आहे.संजयकाकांनी राजकारणात प्रवेश केला, तेव्हा ते कोणत्या पक्षात होते, याचा विसर त्यांना पडला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी असा त्यांनी प्रवास केला.
राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार म्हणूनही त्यांनी काम केले आहे. विधानसभेची निवडणूक अपक्ष आणि काँग्रेसच्या चिन्हावर लढवली होती. कॉँग्रेसकडून महामंडळ अध्यक्षपद भोगले. तेव्हा विकास कामांसाठी कोट्यवधीचा निधी उपलब्ध झाला होता. गेल्या ५० वर्षांत जर निधी आला नसेल तर, ते काय करत होते? वास्तविक ते खासदार होण्यापूर्वी टेंभूचे पाणी आटपाडीमध्ये, तर म्हैसाळचे पाणी जतला पोहोचले होते. ताकारी, म्हैसाळ योजनांचे काम बहुतांशी पूर्ण झाले होते. जिल्'ातील महामार्गांची कामे जुनीच प्रस्तावित होती. निवडणुकीपूर्वी खासदारांनी जी आश्वासने दिली होती, ती पूर्ण करावीत. उद्योग, व्यवसाय आणून तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले, त्याचे काय झाले, असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला.
जनसंपर्क अभियान राबविणार
जिल्हा कॉँग्रेसच्यावतीने संपूर्ण जिल्'ात जनसंपर्क अभियान राबवण्यात येणार असल्याचे विशाल पाटील यांनी सांगितले. भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांचा पाढा जनतेसमोर मांडला जाईल. वाढती महागाई, इंधन दरवाढ, बेरोजगारी, रखडलेली शेतकरी कर्जमाफी योजना, शेतकºयांचे घटलेले उत्पन्न याबाबत प्रबोधन केले जाईल. महापालिकेत भाजपची सत्ता आली आहे, मात्र प्रत्यक्षात कामांमध्ये कोणताही फरक पडलेला नाही. त्याविरोधात आवाज उठवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.