संजयकाका, घोरपडे, शेट्टी गटाचा पत्ता कट
By admin | Published: April 7, 2017 12:10 AM2017-04-07T00:10:59+5:302017-04-07T00:10:59+5:30
जिल्हा परिषद सभापती निवडी; भाजपचाच करिष्मा; रवी, राजमाने, पडळकर, नायकवडी बिनविरोध
सांगली : जिल्हा परिषद विषय समितीच्या सभापती निवडीत भाजपच्या नेत्यांनी खासदार संजयकाका पाटील गट, माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि खासदार राजू शेट्टी समर्थकांचा पत्ता कट केला. भाजपचे ब्रह्मदेव पडळकर (खरसुंडी, ता. आटपाडी), अरुण राजमाने (मालगाव, ता. मिरज), तम्मनगौडा रवी (जाडरबोबलाद, ता. जत) आणि रयत विकास आघाडीच्या प्रा. सुषमा नायकवडी (वाळवा) यांची सभापतिपदी बिनविरोध निवड झाली. पडळकर यांना समाजकल्याण, तर नायकवडींना महिला-बालकल्याण समिती देण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी निवडीची प्रक्रिया पार पडली. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रमेश जोशी, किरण जाधव यावेळी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेत रयत विकास आघाडी, शिवसेना, घोरपडे गट, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पाठिंब्यावर भाजप सत्तेवर आला आहे. सभापती निवडीवरून भाजप आणि रयत आघाडीमध्ये रस्सीखेच होती. जत, मिरज आणि आटपाडी तालुक्यांचा दावा कायम होता. बुधवारी रात्री उशिरा नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. गुरुवारी सकाळी सत्ताधारी भाजप आघाडीच्या पस्तीस सदस्यांची बैठक अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या सांगलीतील शासकीय ‘वसंत’ बंगल्यावर झाली. त्यात सांगलीत भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी सदस्यांच्या बैठकीत नावे जाहीर केली. विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या २६ सदस्यांची बैठक जिल्हा परिषदेसमोरील राष्ट्रवादीच्या कार्यालयात पार पडली.
सत्ताधारी भाजप आघाडीने विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत विकासासाठी समन्वयाने काम करण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर, सभापती निवडीसाठी दाखल केलेले अर्ज विरोधकांनी मागे घेतले. त्यामुळे चारही सभापतींच्या निवडी बिनविरोध झाल्या. समाजकल्याण सभापतीपदी ब्रह्मदेव पडळकर, तर महिला-बालकल्याण सभापतीपदी अपेक्षेप्रमाणे रयत आघाडीतील प्रा. डॉ. सुषमा नायकवडी यांची वर्णी लागली. जत तालुक्यातील तम्मनगौडा रवी आणि मिरजेतील अरुण राजमाने यांनाही सभापतीपदी संधी मिळाली. भाजपला तीन, तर विकास आघाडीला एक सभापतीपद देण्यात आले. पहिल्या टप्प्यात अजितराव घोरपडे गट, खा. संजयकाका गट आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पत्ता कट करण्यात आला. विषय समित्यांचे सर्व सदस्यांना वाटप २० एप्रिलच्या सर्वसाधारण सभेत होणार आहे.
निवडीनंतर पृथ्वीराज देशमुख यांनी नवनिर्वाचित सभापतींचा सत्कार करत काँग्रेस व राष्ट्रवादीला बरोबर घेऊन काम करण्याचे आवाहन केले. यावेळी इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, दीपक शिंदे-म्हैसाळकर, शहर जिल्हाध्यक्ष शेखर इनामदार, माजी जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड, गोपीचंद पडळकर, पंचायत समिती सदस्य राहुल महाडिक, गौरव नायकवडी उपस्थित होते.
शेट्टी, घोरपडेंचा पत्ता कट
मागील आठ दिवसांपासून अजितराव घोरपडे गट, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सभापती पदासाठी फिल्डिंग लावली होती, मात्र आघाडी व संघटनेचा पत्ता निवडीत कट करण्यात आला. खा. राजू शेट्टी व घोरपडे यांनी सभापती पदाची मागणी केली होती, मात्र बुधवारी मुंबईमध्ये भाजप आणि मित्र पक्षांच्या बैठकीत मित्र पक्षांची समजूत काढण्यास भाजपला यश आले. त्यामुळे दोघांना पुढच्या टर्ममध्ये संधी दिली जाणार आहे. यासोबत खा. संजयकाका गटालाही बाजूला करण्यात त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना यश आले.
अध्यक्ष, उपाध्यक्ष राष्ट्रवादीच्या कार्यालयात
सभापती निवडीसाठी पुरेसे संख्याबळ नसताना काँग्रेस-राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल करण्यात आले होते. अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख आणि उपाध्यक्ष सुहास बाबर थेट राष्ट्रवादीच्या कार्यालयात दाखल झाले. जिल्"ाच्या विकासासाठी मिळून-मिसळून काम करण्याची विनंती केली. सर्वांनी एकत्र येऊन काम केले तर, प्रश्न सुटणार आहेत. त्यासाठी अर्ज मागे घेण्याची विनंती अध्यक्ष देशमुख यांनी केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांनी काँग्रेसचे सत्यजित देशमुख, जितेंद्र पाटील, राष्ट्रवादीचे बाळासाहेब पाटील, चंद्रकांत पाटील, शरद लाड यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीकडून अर्ज मागे घेण्यात आले.
समिती सदस्य बिनविरोध करू - संग्रामसिंह देशमुख
जिल्"ाच्या विकासासाठी विरोधाला विरोध न करता सत्ताधारी आणि विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने समन्वयाने काम करण्याचा निर्णय घेतला आहे. २० एप्रिल रोजी होणाऱ्या विषय समित्यांच्या सदस्य निवडीही बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी सांगितले. आमच्या कारकीर्दीत नवीन प्रथा निर्माण केली असून, काम करताना अडचणी येणार नाहीत, असे ते म्हणाले.
महिला, बालकल्याणचा चेहरा निर्माण करू - प्रा. सुषमा नायकवडी
महिला, बालकल्याण विभाग हा नेहमीच दुर्लक्षित राहिला आहे. कामांच्या माध्यमातून या विभागाला चांगला चेहरा निर्माण करुन दिला जाणार असल्याचे नूतन सभापती प्रा. सुषमा नायकवडी यांनी सांगितले. सभापती निवडीसाठी रयत आघाडीचे नेते कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आ. शिवाजीराव नाईक, नानासाहेब महाडिक, वैभव नायकवडी यांच्यासह भाजप नेत्यांनी विश्वास टाकत संधी दिली आहे, असे त्या म्हणाल्या.
विरोधकांना सोबत घेऊन काम - ब्रह्मदेव पडळकर
समाजातील तळागाळातील लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी विरोधकांना सोबत घेऊन काम करण्यात येणार असल्याचे नूतन समाजकल्याण सभापती ब्रह्मदेव पडळकर यांनी सांगितले. मागासवर्गीय समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला जाणार आहे. समाजकल्याणसाठी मुख्यमंत्र्यांकडूनविशेष निधी आणणार आहे. महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यामुळेच संधी मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.