संजयकाकांना मिळणार कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 11:32 PM2018-09-07T23:32:26+5:302018-09-07T23:32:30+5:30
तासगाव : कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजयकाका पाटील यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेकडूनही याच महामंडळाच्या उपाध्यक्षपदी नितीन बानुगडे पाटील यांची वर्णी लावली होती. त्यामुळे आता भाजपकडून, शासन स्तरावर पहिल्यांदा विशेष बाब म्हणून संजयकाकांच्या उपाध्यक्षपदाला कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संजयकाकांच्या नावाबरोबरच विदर्भ विकास महामंडळाचे अध्यक्ष सुनील देशमुख यांनाही कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात येणार आहे.
भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांना काही महिन्यांपूर्वी कृष्णा खोरे विकास महामंडळावर उपाध्यक्ष पदाची संधी देण्यात आली होती. उपाध्यक्षपदी वर्णी लागल्यानंतर खासदार पाटील यांनी पाणी योजनांचा आढावा घेत, रखडलेल्या पाणी योजना मार्गी लावण्यासाठी, त्यासाठी आवश्यक निधी मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य स्तरावर पाठपुरावा केला होता. खासदार पाटील यांनी पाठपुरावा करून उरमोडी धरणासाठी ४८२ कोटी रुपये, टेंभूसाठी पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत बाराशे तीन कोटी रूपये, म्हैसाळसाठी सुमारे दोन हजार कोटी रुपये मंजूर करून आणले. टेंभू योजनेसाठी मंजूर झालेल्या निधीसाठी निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली असून लवकरच रखडलेल्या कामांना सुरुवात होणार आहे. मंजूर झालेल्या निधीतून सात ते आठ महिन्यांत बहुतांश कामे मार्गी लागणार आहेत. नुकताच नाबार्डकडून विशेष फंड मंजूर झाल्याने माण, येरळा नदी बारमाही होणार आहे.
खासदार पाटील यांच्या प्रयत्नामुळे वर्षभरात दुष्काळी पट्ट्यातील पाणीप्रश्न मार्गी लागणार आहे. संजयकाका उपाध्यक्ष असलेल्या महामंडळावरच शिवसेनेकडून नितीन बानुगडे पाटील यांचीदेखील उपाध्यक्ष म्हणून वर्णी लावली होती. त्यामुळे एकाच महामंडळावर दोन्ही पक्षांचे उपाध्यक्ष काम करणार होते. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून संजयकाकांना आणखी एक सरप्राईज गिफ्ट दिले जाणार असून चार दिवसात राज्यमंत्री पदाऐवजी कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात येणार आहे. यानिमित्ताने जिल्'ातील भाजपला आणखीनच बळकटी मिळणार आहे. कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा मिळाल्यास, महामंडळाच्या माध्यमातून दुष्काळी भागाला मोठा फायदा होणार आहे. राज्य शासनाकडून खासदार पाटील यांच्यासोबतच विदर्भ विकास महामंडळाचे अध्यक्ष सुनील देशमुख यांनाही कॅबिनेटचा दर्जा मिळणार असल्याचे संकेत आहेत.