संजयकाका-पडळकरांमध्ये पुन्हा जुंपली : ध्वनिचित्रफिती व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 12:04 AM2018-12-08T00:04:57+5:302018-12-08T00:07:09+5:30
अविनाश बाड । आटपाडी : खासदार संजयकाका पाटील आणि युवा नेते गोपीचंद पडळकर यांच्यात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली ...
अविनाश बाड ।
आटपाडी : खासदार संजयकाका पाटील आणि युवा नेते गोपीचंद पडळकर यांच्यात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. संजयकाका आणि पडळकर यांनी एकमेकांवर केलेल्या टीकेच्या ध्वनिचित्रफिती शुक्रवारी सोशल मीडियावरून व्हायरल झाल्या. ‘बांडगुळे कधी वाढत नसतात’, असे म्हणत संजयकाकांनी पडळकरांवर बोचरी टीका केली आहे, तर ‘संजयकाकाच जिल्ह्यातील एक नंबरचे बांडगूळ’, असे प्रत्युत्तर पडळकर यांनी दिले आहे.
सोशल मीडियात सध्या संजयकाका आणि पडळकर यांच्यात एकमेकांचा समाचार घेणारा मजकूर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका वेब चॅनेलला संजयकाकांचा व्हिडीओ प्रथम आला. त्यात भाजपला रामराम ठोकलेल्या गोपीचंद पडळकर यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले, ‘बांडगूळ दुसऱ्याच्या झाडावर वाढत असते. माझी पाळेमुळे लोकांनी एवढ्या खोलवर नेलेली आहेत, त्यामुळे कोण माझ्याबाबत काय बोलत आहे, कशासाठी बोलत आहे, काय गैरसमज होत आहेत, याची मी आयुष्यात कधी फिकीर करत नाही. ते त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना जे वाटते ते बोलले. मी कधीच डरपोकपणा किंवा अॅडजेस्टमेंटच्या राजकारणाला तयार होणार नाही. त्यांना त्यांच्या पद्धतीने राजकारण करायचे आहे, तर त्यांनी करावे.
जातीयवादाचे विष पेरू नये, असे आमच्यासारख्या माणसाला वाटते. कुठेतरी त्या लाटेवर स्वार होता येईल असे त्यांना वाटते. पण लाट ही लाट असते, हे विसरू नये. समाजामध्ये असे जातीपातीचे विष पेरून कधीही राजकारण करू नये, अशी माझी प्रांजळ भूमिका आहे. गोपीचंद पडळकर हे कशासाठी करत आहेत? मी एकदाच सांगितले आहे की, लोक तुमची लायकी दाखवतात. ती लोकांनी दाखविलेली आहे. उद्या निवडणुकीच्या निमित्ताने लोक पुन्हा दाखवतील, कोणाची लायकी काय आहे ती!’
संजयकाकांच्या या टीकेनंतर गप्प बसतील ते पडळकर कसले? त्यांनीही लगेचच एका जाहीर कार्यक्रमात संजयकाकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यांचीही व्हिडीओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, ‘ही असली दादागिरी करणाºया नेत्यांसाठीच गोपीचंद पडळकरांचा जन्म झाला आहे.
२०१४ ला लोकसभेला मी प्रचंड काम केले. मी जर जातीयवादी असतो, तर तुम्ही खासदार कसे झाला असता? संजयकाकांची बाजू मांडायला तेव्हा जिल्ह्यात कोण नव्हते.
संभाजी पवार आणि प्रकाश शेंडगे हे भाजपचे दोन आमदार ठामपणे त्यांच्याविरोधात बोलत होते. तेव्हाच ते यांना गुंड, मवाली म्हणत होते. मी यांना हांजी-हांजी करत नाही. बांडगूळ झाडावर चढते. संजयकाका जिल्ह्यातले एक नंबरचे बांडगूळ आहेत. वसंतदादांच्या घराण्यातल्या प्रकाशबापूंच्या बोटाला धरून हे राजकारणात आले आणि २०१४ मध्ये त्याच घराण्याचा पराभव केला. आर. आर. पाटील यांच्यासोबत राष्ट्रवादीत गेले. आमदार झाले. त्यांच्या घराण्याला आता खालच्या पातळीवरून शिव्या देत आहेत.
भाजपच्या कमळाच्या चिन्हावर निवडून आले आणि जिल्ह्यातील सगळ्या भाजप नेत्यांना त्रास देत आहेत. मग सांगा कोण बांडगूळ आहे? मी कुणाच्या जिवावर राजकारण करत नाही. जनतेच्या जिवावर राजकारण करतो. मी पुढाºयांच्या जिवावर राजकारण करत नाही. स्वत:च्या हिमतीवर राजकारण करत आहे.’ असे प्रत्युत्तर त्यांनी दिले आहे.
ऐन थंडीत सध्या जिल्ह्यातील या दोन बड्या राजकीय नेत्यांच्या टीका-टिप्पणीमुळे राजकारण गरम होऊ लागले आहे. संजयकाका आणि पडळकर यांचे कार्यकर्ते आपापल्या नेत्यांची बाजू घेऊ लागले आहेत. त्यामुळे परिसरात सध्या हाच चर्चेचा विषय बनला आहे.
निवडणुकीत रंगणार वाद
गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याविरोधात बोलून गोपीचंद पडळकर यांनी खासदार संजयकाका पाटील यांच्यासमवेत तासगाव परिसरातील अनेक सभा गाजविल्या. त्यानंतर संजयकाका आणि पडळकर यांच्यात अनेकवेळा वादाची ठिणगी पडली. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही दोघांची एकत्रित बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. पण तो फोल ठरल्याची चर्चा आहे. आता पडळकर लोकसभा लढविणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हा वाद आणखी रंगण्याची चिन्हे आहेत.