संजयकाकांचा पापाचा घडा भरला; दंडुकशाही मोडीत काढू: विशाल पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 11:37 PM2019-04-07T23:37:27+5:302019-04-07T23:37:32+5:30
तासगाव : आर. आर. आबा पाटील नाहीत म्हणून खासदार संजयकाका पाटलांच्या अंगात चांगलीच मस्ती चढली आहे. आपण काहीही करू ...
तासगाव : आर. आर. आबा पाटील नाहीत म्हणून खासदार संजयकाका पाटलांच्या अंगात चांगलीच मस्ती चढली आहे. आपण काहीही करू शकतो; अशी परिस्थिती त्यांनी निर्माण केली आहे. त्यांच्या पापाचा घडा आता भरला असून, त्यांची दंडुकशाही मोडीत काढू. लोकसभा निवडणूक ही संधी आहे. आबा आणि वसंतदादांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांबरोबर तासगाव तालुक्यातूनही मताधिक्य मिळेल, असा विश्वास विशाल पाटील यांनी व्यक्त केला.
ढवळी (ता. तासगाव) येथे तासगाव तालुक्यातील प्रचाराचा प्रारंभ करताना ते बोलत होते.
विशाल पाटील म्हणाले की, खासदार पाटील यांना, घरातल्याच व्यक्तींना चांगली वागणूक देता येत नाही. मग त्यांच्याकडून लोकांनी काय अपेक्षा ठेवायची. गेली पाच वर्षे त्यांनी सांगली जिल्ह्यातील जनतेवर अन्याय केला आहे. आता जनताच त्यांना घरी बसविणार आहे. तासगाव तालुक्यात खासदार पाटील यांची गुंडशाही वाढली आहे. त्यांनी आमदार सुमनताई पाटील यांना कोंडून मारण्याचा प्रयत्न केला. तासगावभोवतीच्या जमिनी दंडुकशाहीने रेटून स्वत:च्या नावावर करुन घेतल्या आहेत.
आमदार सुमनताई पाटील म्हणाल्या की, भाजप सरकार शेतकरीविरोधी असून, ते परत सत्तेत येता कामा नयेत. विशाल पाटील महाआघाडीचे भक्कम उमेदवार आहेत. त्यांना जनतेची पसंती मिळत आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे, सुरेश पाटील, डी. के. पाटील, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, हणमंतराव देसाई, ताजुद्दीन तांबोळी, विजय पाटील, जोतिराम जाधव उपस्थित होते.
यापुढे ‘आ रे’ला ‘का रे’!
विशाल पाटील म्हणाले की, मी वसंतदादा आणि आर. आर. आबांच्या विचारांचा वारसदार आहे. जनतेसाठी अखेरपर्यंत लढत राहणार आहे. माझ्यावर वसंतदादांचे चांगले संस्कार आहेत. मी सरळ वागणारा आहे, पण कोणालाही घाबरणारा नाही. मी गुंडगिरी करणार नाही. गुर्मीत वागणार नाही. मात्र जर कोणी ‘आ रे’ करत असेल, तर त्याला ‘का रे’ म्हणायला मी समर्थ आहे.