सांगलीत महावितरणकडून ग्राहकाला शून्य वीजबिल...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 11:50 PM2018-06-03T23:50:12+5:302018-06-03T23:50:12+5:30
सांगली : महावितरणच्या अजब कारभाराचा नमुना रविवारी सांगलीच्या सोशल मीडियावर व्हायरल झाला. एका ग्राहकाला चक्क शून्य वीजबिल पाठविताना, मुदतीनंतर दहा रुपये दंडाची तरतूदही त्यात केल्यामुळे ग्राहकाला हे बिल भरायचे कसे?, असा प्रश्न पडला आहे. हरिपूर रोडवरील राहुल महावीर वरड या प्रकारामुळे चक्रावले आहेत.
सांगलीत राहणाऱ्या राहुल वरड यांचे हरिपूर हद्दीत एका पत्र्याच्या शेडमध्ये छोटे मिठाचे गोदाम व पॅकिंगचा उद्योग आहे. मिठाचे पॅकिंग करून ते दुकानदारांना त्याचा पुरवठा करीत असतात. मे महिन्याचे चालू वीजबिल नुकतेच त्यांच्या हातात पडले. हे बिल शून्य रुपये असल्याने त्यांना फारसा धक्का बसला नाही, पण त्याखाली दंडाचा दिलेला इशारा वाचून त्यांना धक्का बसला. त्यांनी यासंदर्भात महावितरण कंपनीशी संपर्क साधला होता, पण त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे वरड यांनी सांगितले. यापूर्वीही एप्रिल महिन्यात त्यांना शून्य वीजबिल आले होते. एप्रिल महिन्यातील त्यांचा वीज वापर ७0 युनिट होता. याबाबत तक्रार केल्यानंतर, तांत्रिक चूक असल्याचे कारण सांगून महावितरणच्या अधिकाºयांनी त्यांना १ हजार ८00 रुपयांचे नवीन बिल दिले. त्यांनी ते भरले. पुन्हा मे महिन्यात त्यांना शून्य रुपये बिल आल्याने ते पुन्हा चक्रावले आहेत.
गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेला हा शून्य बिलाचा गोंधळ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. बिल शून्य असेल तर दहा रुपये दंड कसा भरायचा?, असा प्रश्न त्यांना पडला आहे. नेमका हा प्रकार कशामुळे होत आहे हे त्यांना समजलेले नाही. त्यामुळे त्यांनी अधिकाºयांशी संपर्क साधला असता, अॅडव्हान्स रक्कम भरली असल्यामुळे हे बिल शून्य रुपये आले असल्याचे वरड यांना सांगण्यात आले.
तरीही ५ जूनपर्यंत बिल न भरल्यास दहा रुपये दंड मी कसा भरायचा?, असा सवाल त्यांनी अधिकाºयांकडे केल्यानंतर, ही तांत्रिक चूक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तरीही वरड यांनी शून्य रकमेचा मी धनादेश महावितरणला देणार असल्याचे सांगितले.
महावितरण काय म्हणते...
मे महिन्याचे वरड यांचे बिल आॅनलाईन उपलब्ध आहे. त्यामध्ये त्यांचा मे महिन्याचा वीज वापर ९९ युनिट दिसतो. त्याचे एकूण बिल १ हजार २२२.२६ रुपये दिसते. त्यातून थकबाकी व तडजोडीची रक्कम त्यांनी वजा दाखविल्यामुळे, वीजबिल उणे 0.८२ इतके दिसते. त्यामुळे शून्य बिल आणि त्यावर नियमाप्रमाणे मुदतीनंतर दंडाचा उल्लेख म्हणून १0 रुपये दाखविले आहेत. ही एक तांत्रिक चूक असून त्यामध्ये दुरुस्तीबाबत कल्पना दिल्याचे महावितरणच्या अधिकाºयांनी सांगितले.