संजयकाका गट जोमात; काँग्रेस-राष्ट्रवादी कोमात
By admin | Published: June 29, 2016 11:40 PM2016-06-29T23:40:00+5:302016-06-30T00:06:03+5:30
तासगाव - नगरपालिकांचे संभाव्य चित्र
दत्ता पाटील --तासगाव नगरपालिकेची निवडणूक नोव्हेंबरमध्ये होत आहे. पालिकेत सद्यस्थितीत खासदार संजयकाका पाटील यांची एकहाती सत्ता आहे. ही सत्ता काबीज करण्यासाठी खासदार संजयकाका पाटील यांनी राष्ट्रवादीतील काहींना भाजपमध्ये खेचले होते. तर काही राष्ट्रवादीच्या कारभाऱ्यांनी राष्ट्रवादीत राहूनच भाजपला सत्तेत आणण्यात हातभार लावला होता.
मागील पाच वर्षात पहिला अंक आबा-काका गटाच्या सत्तेचा झाला. त्यानंतर दुसरा अंक राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या एकत्रित सत्तेचा झाल. आणि मागील सहा महिन्यांपासून राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश करुन, तर काहींनी पाठिंबा दिलेल्या भाजपच्या सत्तेचा तिसरा अंक सुरु आहे. पालिकेच्या राजकारणातील हे तीन अंकाचे नाटक पाहण्यापलीकडे तासगावकरांचे कोणतेच हित साधले गेले नाही.
तासगावात भाजप भक्कम असल्याचे चित्र सध्याच्या राजकीय घडामोडींवरुन दिसून येत आहे. भाजपमध्ये इच्छुकांचा भरणाही मोठा आहे. त्यामुळे भाजप सत्तेत कायम राहण्यासाठी मांड ठोकणार हे निश्चित आहे. विरोधी कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीनेदेखील निवडणुकीसाठी जुळवाजुळव सुरु केली आहे. मात्र काँग्रेस स्वबळावर सत्तेत येण्यासाठी कार्यकर्त्यांची फळी मजबूत नाही. तर राष्ट्रवादीकडे कार्यकर्त्यांची फळी मजबूत असूनदेखील विरोधक म्हणुन प्रभाव पाडणारे नेतृत्व नाही. त्यामुळे हे दोन्ही पक्ष भाजपविरोधात एकवटणार का? असा प्रश्न आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झाल्यास दुरंगी लढत होईल, अन्यथा तिरंगी लढत होणार हे निश्चित आहे.
यापूर्वीच्या सोडतीत नगराध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित होते. त्यानंतर शासनाने नगराध्यक्षपदासाठी थेट निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आरक्षण बदल होणार की जैसे थे राहणार याबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. नगराध्यक्षपदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी राहिल्यास पालिकेसाठी तिरंगी लढत अटळ राहणार आहे. भाजपमध्ये इच्छुकांचा भरणा मोठा असला तरी खासदार संजयकाका सांगितील तोच उमेदवार नगराध्यक्षपदासाठी निश्चित होणार आहे. राष्ट्रवादीकडून अजय पाटील आणि अमोल शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे. तर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील स्वत रिंगणात उतरणार हे निश्चित आहे. मात्र नगराध्यक्षपद आरक्षित राहिल्यास कॉग्रेस राष्टवादी एकत्रित येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. किंंबहुना खुल्या गटासाठी आरक्षण निश्चित झाल्यास, त्याचा परिणाम निवडणुकीवर होऊ शकतो. त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या आरक्षणावर बरीच समीकरणे अवलंबून असणार आहेत.
तुर्तास सर्वच पक्षांचे ‘एकला चलो रे’ चे धोरण दिसून येत असून, निवडणुका नजरेसमोर ठेवनूच सर्व पक्षांची वाटचाल सुरु असल्याचे चित्र आहे.
तासगाव नगरपालिकेची निवडणूक नोव्हेंबरमध्ये होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापत आहे. सत्तेत असलेल्या भाजपने सत्ता काबीज करण्यासाठी तयारी सुरु केली आहे. तर भाजपला सत्तेतून पायउतार करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. गतवेळच्या निवडणुकीत दोन दिग्गज नेते एकत्रित होते. यावेळी समीकरणे बदलली आहेत. शहरातील राजकारण पुन्हा एकदा संघर्षाच्या वळणावर येऊन ठेपले आहे. सद्यस्थितीत भाजपविरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे चित्र आहे. मात्र निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित येणार का? याची उत्सुकता आहे.
नगराध्यक्षपद बनलेय दीड दिवसाचा गणपती
माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर खासदार संजयकाका पाटील यांनी साम, दाम, दंड, भेदाचा वापर करून पालिकेची सत्ता हस्तगत केली. यानंतर बेरजेचे राजकारण करताना पालिकेतील महत्त्वाच्या पदांचे अक्षरश: तुकडे पाडले. नगराध्यक्षपदासारख्या जबाबदार पदाची सदस्यांमध्ये दोन-तीन महिन्यांसाठी वाटणी केली. सदस्यही ‘माजी नगराध्यक्ष’ उपाधी मिरविण्यात धन्यता मानत असून त्याचा परिणाम विकासकामांवर झाला आहे. नागरिकांमधून मात्र नेत्यांनी नगराध्यक्षांना ’दीड दिवसाचा गणपती’ बनविल्याची जोरदार टीका होत आहे.
२ जुलैला आरक्षण सोडत
नव्या निर्णयानुसार तासगावात दहा प्रभाग होणार असून, नगरसेवकांची संख्या २१ वर जाणार आहे. प्रत्येक प्रभागात दोन नगरसेवक, तर एका प्रभागात तीन नगरसेवक राहणार आहेत. प्रभागनिहाय आरक्षण सोडत २ जुलै रोजी होणार आहे. त्यानंतर संभाव्य इच्छुक आणि निवडणुकीच्या मोर्चेबांधणीस खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे.