ड्रायपोर्टवरून नेत्यांत जुंपली संजयकाका पाटील : प्रकाश शेंडगे अडगळीत पडलेले नेते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 01:13 AM2017-12-26T01:13:12+5:302017-12-26T01:16:39+5:30
सांगली : रांजणी येथील जागा हडप करण्याचा प्रकाश शेंडगे यांनी माझ्यावर केलेला आरोप
सांगली : रांजणी येथील जागा हडप करण्याचा प्रकाश शेंडगे यांनी माझ्यावर केलेला आरोप प्रसिद्धीपोटीचा आहे. ते अडगळीत पडलेले नेते आहेत. त्यांची फार दखल घ्यावीशी वाटत नाही, असा पलटवार खासदार संजय पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. ड्रायपोर्टच्या रांजणीतील प्रस्तावित प्रकल्पाच्या जागेवरून या दोन्ही नेत्यांमध्ये आता जुंपली आहे.
रांजणी (ता. कवठेमहांकाळ) येथे बावीसशे एकर जमिनीवर शेळी-मेंढी संशोधन केंद्र सुरू केले आहे. या संशोधन केंद्राची जागा ड्रायपोर्टच्या नावाखाली हडप करण्याचा डाव संजयकाकांनी आखला आहे, अशी टीका जतचे माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी रविवारी केली होती. त्याविषयी पाटील म्हणाले की, ड्रायपोर्टसाठी रांजणीतील जागा सुचविली आहे. राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे मार्ग उपलब्ध असल्यामुळे हे ठिकाण निवडले आहे.
मात्र रांजणीमधील कोणती जागा पोर्टसाठी निवडायची, हे शासन ठरवणार आहे. अहिल्यादेवी शेळी-मेंढी पालन केंद्राच्या जागेसह गायरान जागाही याठिकाणी उपलब्ध आहे. जागांची पाहणी करण्यासाठी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे प्रतिनिधी येणार आहेत. सध्या उपलब्ध जागांचा वापर आणि पोर्टसाठीची गरज यावरून जागा निश्चितीबाबत शासन निर्णय घेणार आहे.
पोर्टच्या माध्यमातून कोणत्याही समाजाच्या भावना दुखावण्याचा उद्देश नाही. उलट पोर्टमुळे दुष्काळी भागात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहेत. सांगली, कोल्हापूर जिल्हा व परिसरातील डाळिंब, द्राक्ष, साखर यासह इतर उत्पादनांची निर्यात करण्याचा दृष्टिकोन आहे. ड्रायपोर्टमुळे स्थानिक लोकांचा आर्थिक विकास होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे यात कुणीही राजकारण आणू नये. प्रसिद्धीपोटी असे आरोप शेंडगे करीत आहेत, असे पाटील म्हणाले.
ड्रायपोर्ट बनणार : कळीचा मुद्दा
ड्रायपोर्टच्या जागेवरून सध्या भाजपचे खासदार संजयकाका पाटील आणि प्रकाश शेंडगे यांच्यात जुंपली आहे. ही जागा जिल्ह्यातील दोन्ही पक्षांच्या नेत्यांमधील संघर्षात कळीचा मुद्दा बनण्याची चिन्हे दिसत आहेत.