कवठेमहांकाळच्या ठिणगीने उडणार तासगावात भडका, संजयकाका पाटील-रोहित पाटील गटात संघर्ष वाढणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2022 04:10 PM2022-11-05T16:10:25+5:302022-11-05T16:11:20+5:30
कवठेमहांकाळ नगराध्यक्ष निवडणुकीचे उट्टे काढण्यासाठी रोहित पाटील यांनी तासगाववर लक्ष केंद्रित केले आहे.
दत्ता पाटील
तासगाव : कवठेमहांकाळ तालुक्यातील नगराध्यक्ष निवडीच्या निमित्ताने खासदार आणि आमदार एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले. या निवडीत दोन्ही गटांत संघर्षाची ठिणगी उडाली आहे. या ठिणगीचा तासगाव तालुक्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भडका उडणार आहे. त्यामुळे आबा-काका गटातील संघर्ष मूळ वळणावर येणार असल्याचे चित्र आहे.
कवठेमहांकाळ नगरपंचायतीत राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांनी एकहाती सत्ता आणली. मात्र, खासदार संजयकाका पाटील यांनी नगराध्यक्ष बदलावेळी ‘काका स्टाईल’ने सत्तांतर घडवून भाजपचा नगराध्यक्ष करून दाखविला. यानिमित्ताने तत्कालीन उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील (आबा) यांच्या पश्चात, आमदार-खासदार गटात सुरू असलेल्या ‘अंडरस्टँडिंग’च्या राजकारणाला ब्रेक मिळाल्याचे स्पष्ट झाले.
तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात विशेषत: तासगाव तालुक्यात आबा गटाविरुद्ध काका गट असा पारंपरिक टोकाचा संघर्ष तालुक्याने अनेक वर्ष अनुभवला होता. मात्र, आबांच्या पश्चात या संघर्षाला पूर्णविराम मिळाला. आमदारही आपला आणि खासदारही आपला, या पॅटर्नने तासगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांनी जुळवून घेतले होते. मात्र, या तडजोडीला कवठेमहांकाळ नगरपंचायतीतील नगराध्यक्ष निवडीने ब्रेक लागला आहे.
ती निवड ज्या पद्धतीने झाली, त्यावरून आबा-काका गटातील आणि दोन्ही गटांच्या नेत्यांतील संघर्ष मूळ वळणावर आल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडीनंतर दोन्ही गटाकडून दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोप, सोशल मीडियावर रंगले आहेत. तालुक्यावर कोणाचे वर्चस्व राहणार हे आगामी निवडणुकांतून स्पष्ट होणार आहे.
रोहित पाटील उट्टे काढणार का?
येत्या काही दिवसांत तासगाव तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, तासगाव बाजार समिती आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. कवठेमहांकाळ नगराध्यक्ष निवड रोहित पाटलांसाठी धक्कादायक, तर खासदार संजयकाकांसाठी वर्चस्व सिद्ध करणारी ठरली. त्यामुळे तासगाव तालुक्यात होणाऱ्या निवडणुकीत वर्चस्व कायम राखण्यासाठी खासदार पाटील यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे, तर कवठेमहांकाळचे उट्टे काढण्यासाठी रोहित पाटील यांनी तासगाववर लक्ष केंद्रित केले आहे.