कवठेमहांकाळला संजयकाका यांचा घात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:54 AM2020-12-11T04:54:46+5:302020-12-11T04:54:46+5:30
कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यात नवीन राजकीय वादाची ठिणगी पडली असून, कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष निवडीत खासदार संजयकाका पाटील यांचा घात ...
कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यात नवीन राजकीय वादाची ठिणगी पडली असून, कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष निवडीत खासदार संजयकाका पाटील यांचा घात झाला आहे. राष्ट्रवादीचा सगरे गट आणि अजितराव घोरपडे गटाने एकत्र येत उपनगराध्यक्ष पद खेचून घेतले. त्यामुळे सगरे-घोरपडे हे नवीन समीकरण उदयास आले आहे.
तासगाव, कवठेमहांकाळ मतदारसंघात भाजपचे खासदार संजयकाका पाटील आणि राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील यांच्यामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राजकीय सामंजस्य करार झाला. तो दोन्ही निवडणुकीत इमानेइतबारे पाळला. कवठेमहांकाळ पंचायत समिती सभापती निवडीमध्ये राष्ट्रवादीचे नेते सुरेश पाटील यांनी पंचायत समितीमध्ये भाजपचा केवळ एक सदस्य असताना विकास हाक्के यांना सभापती केले. यामुळे राष्ट्रवादीच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती.
महिन्यापूर्वी काका गटाच्या उपनगराध्यक्षा सिंधुताई गावडे यांनी पदाचा राजीनामा दिला. विशाल वाघमारे यांना बिनविरोध करण्यासाठी खासदार पाटील यांनी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना व नगरसेवकांना सांगितले. त्यानुसार बुधवारी निवडणूक होती.
परंतु मागील आठवड्यात सगरे आणि घोरपडे गटाच्या एकीची राजकीय खिचडी शिजली आणि संजयकाका यांचे सगळेच फासे फिरले. निवडणुकीवेळी आठ विरुद्ध सात मताने सगरे गटाचे अय्याज मुल्ला उपनगराध्यक्ष झाले.
राष्ट्रवादीचे गजानन कोठावळे आणि घोरपडे गटाचे सुनील माळी यांनी खासदार गटाला मदत केली, तर खासदार गटाच्या वैशाली बाळासाहेब पाटील यांनी सगरे गटाचे अय्याज मुल्ला यांना मदत केली. खासदार संजयकाका पाटील आणि राष्ट्रवादी, सगरे गट यांचे राजकीय सख्य होते. सगरे गट हा राष्ट्रवादीमधीलच राजकीय गट आहे. हा सगरे गट राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील तसेच सुरेश पाटील यांना विचारल्याशिवाय कोणताही निर्णय विरोधात जाऊन घेत नाहीत. असे असताना खासदार संजयकाका पाटील यांच्याविरोधात सगरे गटाने कुणाच्या बळावर दंड थोपटले, याची चर्चा जोरात सुरू आहे.
चाैकट
घाव कुणाचा होता
घोरपडे गटाने मात्र राष्ट्रवादीच्या आणि सगरे गटाच्या खांद्यावर बंदूक ठेवत संजयकाकांवर डाव साधला आहे. या निवडीत संजयकाकांना धक्का बसला असून, राजकीय हत्याराविना घायाळ झालो मी, तो घाव कुणाचा होता, राजकीय खेळाविनाच हरलो मी, तो डाव कुणाचा होता, असे म्हणण्याची वेळ आली आहे.